Usha Nadkarni : ऑफिसमध्ये भावाला मारल्याचं समजताच उषा नाडकर्णींची सटकली, त्याला पकडलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:40 IST2025-06-03T18:38:35+5:302025-06-03T18:40:01+5:30
Usha Nadkarni : नुकतेच उषा नाडकर्णी यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या भावाच्या ऑफिसमधला एक किस्सा शेअर केला.

Usha Nadkarni : ऑफिसमध्ये भावाला मारल्याचं समजताच उषा नाडकर्णींची सटकली, त्याला पकडलं अन्...
उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) या मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारून त्या घराघरात पोहोचल्या. बिग बॉस मराठीच्या घरातही त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. नुकतेच उषा नाडकर्णी यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या भावाच्या ऑफिसमधला एक किस्सा शेअर केला.
लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सिनेइंडस्ट्रीतील किस्से आणि त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये भावाला मारणाऱ्या व्यक्तीला कशी अद्दल घडवली होती, याचा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, ''एकदा माझ्या भावाला त्याच्या ऑफिस मधल्या कोणीतरी कदम म्हणून होता त्याने मारले होते. मला आईकडे गेली तेव्हा कळले आणि माझी सटकली. भावाला मारलं म्हणून मी दुसऱ्या दिवशी रजा घेतली आणि ऑफिसमध्ये गेले त्याच्या. माहित नव्हतं पण शोधत शोधत गेले आणि तिथल्या रिसेप्शनिस्टला विचारलं म्हटलं इथून हा जायचा यायचा एकच रस्ता आहे का? ती म्हणाली, हो. मी म्हटलं कलबागच्या डिपार्टमेंटमध्ये अमुक नावाचा मुलगा आहे. त्याला खाली बोलवा तर तो खाली आल्यावर त्याला मी ऑफिसच्या बाहेर धरला म्हटलं कलबागला मारलेला तूच ना. तसा तो घाबरला आणि पळाला.''
पुढे त्यांनी सांगितलं की, ''मग मी त्या रिसेप्शनिस्टला म्हटलं मी इथे बसू का ऑफिस सुटेपर्यंत. ती म्हणाली बसा. म्हटलं मला त्याला पकडायचे आहे. साडेपाचला ऑफिस सुटलं मी बघतच होती खुर्ची अशी घेऊन बसली होती. त्याला जाऊन बाहेर पकडला आणि त्याला बोलले म्हटलं ज्या हाताने मारलंस ना तो हात आणि त्याच्या समोरचा पाय तोडीन आणि उरलेला हातात देईन. कालबागला हात लावला तर.''
''दुसऱ्या दिवशी मी आलेले ऑफिसमध्ये भावाला कळलं. त्या दिवशी भाऊ ऑफिसमध्ये गेला नव्हता. कुठेतरी लग्नाला गेलेला. तो माझ्यावर भडकला. कशाला गेली तू.. म्हटलं तुला त्याने मारले का? मग मी त्याला सोडणार का? म्हणून म्हटलं मी गेले होते. म्हणजे सटकू आहे मी. सटकू म्हणण्यापेक्षा माझ्या भावाला मारलं. माझा भाऊ तुला तर काय करत नाही ना मग तू का मारलं? म्हणून मी त्याला मारायला गेले होते'', असे उषा नाडकर्णी यांनी सांगितले.