वेळेचं नाणं चांगलं वाजलं!

By Admin | Published: June 19, 2015 10:29 PM2015-06-19T22:29:42+5:302015-06-19T22:29:42+5:30

कोणावर कधी काय वेळ येईल हे सांगता येत नाही, असे आपण नेहमी म्हणतो. त्याचप्रमाणे, वेळ कधी सांगून येत नाही असेही म्हणतो. पण यावर एखादा चित्रपट काढता

Time tone is good! | वेळेचं नाणं चांगलं वाजलं!

वेळेचं नाणं चांगलं वाजलं!

googlenewsNext

- राज चिंचणकर

कोणावर कधी काय वेळ येईल हे सांगता येत नाही, असे आपण नेहमी म्हणतो. त्याचप्रमाणे, वेळ कधी सांगून येत नाही असेही म्हणतो. पण यावर एखादा चित्रपट काढता येतो का, असा प्रश्न डोक्यात आल्यास त्याचे 'हो' असे उत्तर निदान आतातरी द्यावे लागेल. कारण आपल्यासमोर आता 'टाइम बरा-वाईट' हा चित्रपट आला आहे. केवळ एका दिवसात घडणाऱ्या अनेक घटनांची पेरणी करत या चित्रपटाने खिळवून ठेवण्यात बाजी मारली आहे आणि या वेळेचं हे नाणं चांगलं वाजलंय.
तुम्हाला नेहमीच्या चित्रपटांतल्या तोचतोचपणाचा कंटाळा आला असेल, तर हा चित्रपट त्यावर उतारा आहे. केवळ करमणूक नव्हे; तर त्यात वापरलेल्या भन्नाट लॉजिकमुळे हा चित्रपट वेगळा अनुभव देत राहतो. या चित्रपटाला दाक्षिणात्य बाजाचा गंध आहे; परंतु त्याचे मराठीकरण करताना हा गंध मस्त दरवळतो. कशाला उगाच खोलात शिरा, समोर दिसणारी चलतचित्रे खुर्चीत बांधून ठेवतात ना, मग झाले तर ! अजून काय हवे?
नोकरी गमावलेल्या राहुलला तातडीने कर्ज हवे असते आणि मित्र नितीनच्या सहाय्याने तो कर्ज घेण्यासाठी भाईराजा या गुंडाकडे येतो. भाईराजा त्याला काही अटींवर कर्ज देतो आणि त्या अटींची पूर्तता वेळच्यावेळी झाली पाहिजे हेही बजावतो. काही महिने राहुल कर्ज फेडत राहतो; पण शेवटचा हप्ता फेडण्याचा दिवस उजाडतो, तेव्हा मात्र राहुलच्या हातात काहीही शिल्लक नसते. मग पुन्हा नितीन त्याच्या मदतीला धावून येतो आणि राहुलसाठी रक्कम उभी करतो. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही रक्कम हातात पोहोचली पाहिजे, अशी भाईराजाची धमकी असते. राहुल ते पाकीट घेऊन भाईराजाकडे जायला निघतो आणि इथून सुरु होते त्याच्या नशिबाची टिकटिक ! राहुलचा हा दिवस आणि ही वेळ चांगली नसते. रस्त्यात त्याच्याकडचे पाकीट लांबवले जाते. ते मिळवताना या एक दिवसाच्या धांदलीत अनेकविध प्रसंग त्याच्या वाट्याला येतात आणि त्यात राहुल अक्षरश: भरडला जातो. त्यातच त्याची प्रेयसी प्रिया, तिच्या घरच्यांचा राहुलला असलेला विरोध लक्षात घेऊन याचवेळी घर सोडून बाहेर पडते. एकात एक अशा अडकलेल्या घटनांची मालिका दाखवत कोणाचा टाइम बरा आणि कोणाचा वाईट यावर हा चित्रपट फोकस टाकत शेवटपर्यंत गोष्ट रंगवत नेतो.
या चित्रपटाचा दिग्दर्शक व संकलक राहुल भातणकर याने यात दमदार खेळी खेळली आहे. फ्रेम टू फ्रेम डोक्यात फिट्ट बसत जाईल आणि एखाद्या चुकार प्रश्नाचा भुंगा मनात गुंजारव करायला लागण्याच्या आधीच, दुसऱ्या प्रसंगात पाहणाऱ्याला कसे गुंतवता येईल, याचे प्रात्यक्षिक त्याने या चित्रपटात करून दाखवले आहे. त्याने व अल्फान्सो पुत्रण यांनी बांधलेली पटकथा मस्त आहे. चित्रपट कुठेही अडकून बसत नाही की रेंगाळत नाही. उलट त्याने राखलेल्या गतीने अचंबित व्हायला होते. एखाददुसऱ्या प्रश्नांची उत्तरे मात्र मिळत नाहीत. उदाहरणार्थ, भाईराजाला लोकांकडून पैसे वसूल करणे हाच उद्योग असतो का, वगैरे वगैरे. तसेच या बड्या गुंडाची दहशतही तेवढी वाटत नाही. पण एकूण चित्रपटाची मांडणी ज्या पद्धतीने केली गेली आहे, त्यात असे प्रश्न विरघळून जातात. पाठलाग, पळापळ वगैरे सुरु असताना यात पार्श्वभूमीवर गाणी वाजतात आणि तेही खटकत नाही, हे सुद्धा विशेष आहे.
चित्रपटात बरेच आघाडीचे कलावंत आहेत. मूळचा अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या सतीश राजवाडेला यात भाईगिरी करताना पाहणे म्हणजे पैसा वसूल आहे. ही भाईगिरी करताना सतीशने स्वत:चा करून घेतलेला कायापालट थक्क करून टाकतो. बारीकसारीक हालचालींतून त्याने जे काही पेश
केले आहे ते निव्वळ अनुभवण्याजोगे आहे. भूषण प्रधान सुद्धा यात फूल टू फॉर्मात आहे. यातला राहुल साकारताना त्याने केलेली जीवतोड मेहनत पडद्यावर दिसते. त्याला मिळालेल्या फूटेजचा भूषणने चांगला वापर करून घेतला आहे. निधी ओझा हिने रंगवलेली प्रिया छान
आहे, तिचा लूक फ्रेश आहे; फक्त तिच्या मराठी उच्चारांवर मेहनत घ्यायला हवी होती. हृषिकेश जोशीने त्याच्या खास स्टाइलने साकारलेला इन्स्पेक्टर विठू पोपट, तसेच भाऊ कदमचा रिक्षावाला मस्तच ! छोट्या भूमिकांमध्येही ते भाव खाऊन जातात. संजय मोने, आनंद इंगळे आदी कलावंतांनीही यात उठावदार रंग भरलेले आहेत. वेळ मस्त जावा असे वाटत असेल आणि एक हटके अनुभव घ्यायची इच्छा असेल, तर हा बरा-वाईट 'टाइम' म्हणजे चांगला पर्याय ठरू शकतो.

- राज चिंचणकर

Web Title: Time tone is good!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.