"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 20:55 IST2025-10-12T20:52:46+5:302025-10-12T20:55:56+5:30
हुंडा प्रथेबद्दल बोलताना अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी खंत व्यक्त केली. बायकोला लक्ष्मी म्हणून घरात आणायचे आणि भिकाऱ्यासारखा हुंडा का मागायचा?, असे ते म्हणाले.

"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
"तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जे हुंडा घेतील ते नामर्द असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण ती बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची, तिने आपल्या लेकरांना जन्म द्यायचा. तिने त्यांच्यावर संस्कार करायचे आणि ती घरात येत असताना भिकाऱ्यासारखे पैसे कशाला मागायचे?", असे परखड भाष्य अभिनेते मकरद अनासपुरे यांनी केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अकोला जिल्ह्यात असलेल्या बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येते कुणबी स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हुंडा प्रथेबद्दल खंत व्यक्त केली.
"स्त्री टिकलीच नाही, तर समाज कसा टिकेल?"
मकरंद अनासपुरे म्हणाले, "उद्या जर स्त्री टिकली नाही, तर समाज कसा टिकेल? आपल्या देशाचे नाव काय आहे, भारत. आपण काय म्हणतो भारत माता की जय, कशामुळे? भारत हा पुल्लिंगी शब्द आहे. पण, आपण भारत माता म्हणतो, त्याचं कारण असं आदिशक्तीचं महत्त्व आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे. आपल्या जुन्या माणसांना कळलेलं आहे म्हणून त्यांनी भारत माता म्हटलेलं आहे."
सोन्याचे भाव वाढले मग कापसाचे अजूनही कमी कसे?
मकरंद अनासपुरे यांनी शेतमालाच्या भावाचा मुद्दाही अधोरेखित केला. ते म्हणाले, "देशातील शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. जर सोन्याचे भाव लाखाच्या वर गेले असतील, तर कापसाला भाव आणखीनही कमी कसा आहे?", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
"शेतकऱ्यांना उद्योजकाचा दर्जा का नाही? शेतकऱ्याच्या अडचणीच्या काळात बँका, पतसंस्था, मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुली करू नये", असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.