छावामधील क्लायमॅक्सचा सीन पाहून चिमुकल्याचा निरागस प्रश्न...'बाबा, महाराज आता...'; बाप समजावता समजावता...
By हेमंत बावकर | Updated: March 17, 2025 13:11 IST2025-03-17T13:07:48+5:302025-03-17T13:11:36+5:30
Chhaava Movie Scene: दगाबाजीने संभाजी महाराजांना पकडण्यात आले, त्यानंतर औरंगजेबाने त्यांचे हाल हाल केले हे सीन तमाम महाराष्ट्रीयन लोकांसाठी खूप भावूक होते तेवढेच वेदनादायी. छावामध्येही एक क्षण असा आला होता की...

छावामधील क्लायमॅक्सचा सीन पाहून चिमुकल्याचा निरागस प्रश्न...'बाबा, महाराज आता...'; बाप समजावता समजावता...
- हेमंत बावकर
आज महाराष्ट्रातील करोडो लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांवर आलेला छावा हा सिनेमा पाहिलाच असेल. छावा या सिनेमात संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या लढाया, झेललेल्या यातना दाखविण्यात आल्या आहेत. दगाबाजीने संभाजी महाराजांना पकडण्यात आले, त्यानंतर औरंगजेबाने त्यांचे हाल हाल केले हे सीन तमाम महाराष्ट्रीयन लोकांसाठी खूप भावूक होते तेवढेच वेदनादायी. इतर अॅक्शन सिनेमामध्ये हिरो निपचित पडलेला असतो आणि अचानक उठून व्हिलनविरोधात लढण्यासाठी उभा राहतो. छावामध्येही एक क्षण असा आला होता. यावेळी हे दृष्य इतर सिनेमांत पाहणाऱ्या चिमुकल्याला 'आपले संभाजी महाराज देखील जोराने उभे ठाकणार आणि लढणार ना' असा प्रश्न पडला होता. त्याने वडिलांना हा प्रश्न विचारला, सहा वर्षांच्या मुलाला समजावता समजावता बापाच्या नाकीनऊ आले होते.
क्रूर औरंग्याने संभाजी महाराजांना साखळदंडांना बांधले होते. त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यात आले होते. नखे काढण्यात आली होती. हाल हाल केले गेले होते. जीभही छाटण्यापूर्वी संभाजी महाराज साखळदंडांना बांधलेल्या अवस्थेत उभे आहेत असे दाखविण्यात आले होते. इतर अॅक्शन सिनेमांमध्ये या क्षणाला हिरो ताडकन उठतो, साखळदंड तोडतो असे दाखविले जाते. चिमुकल्याच्या ते सीन लक्षात होते. त्याने शेजारी बसलेल्या बापाला क्षणात प्रश्न केला, ''बाबा महाराज आता जोराने उठणार ना? सर्वांना मारणार ना...''. बापाकडे मुलाच्या या प्रश्नाचे उत्तर नव्हते. कारण खरा इतिहास वेगळा आणि अॅक्शन सिनेमांत दाखवत असलेला हिरोचा सीन वेगळा असतो. चिमुकल्याची काही चूक नव्हती. कारण बहुतांश सिनेमात तेच तर दाखविले जाते.
मुलाला कसे समजवायचे याची चक्रे बापाच्या डोक्यात गरागरा फिरू लागली. त्याचे ते समजण्याचे वय नव्हते. त्याने मुलाला ''नाही बाळा'', असे उत्तर दिले. ''संभाजी महाराज खरेखुरे होते, इतर सिनेमांत दाखवितात ते खोटे हिरो असतात, ते फक्त अॅक्टिंग करतात. संभाजी महाराज खरे हिरो होते. खऱ्या आयुष्यात ते लढाया लढले होते, तिथे असे होत नाही. ते फक्त बनावट सिनेमात होते. खऱ्या आयुष्यात असे साखळदंड तोडता येत नाहीत.'', असे वडिलांनी मुलाला सांगितले.
हे उत्तर ऐकून असे कसे, हिरो नाही का उठून फाईट करत, असा सवाल केला. त्याच्या भावना निरागस होत्या. आपले संभाजी महाराज उठावेत आणि गनिमांना मारावे अशी त्याची भाबडी अपेक्षा होती. पण ते खरा इतिहास दाखविताना शक्य नव्हते. खूप समजावले तेव्हा मुलाने समजल्याची मान डोलविली खरी परंतू त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न स्पष्ट दिसत होता.
साऊथचे सिनेमे, बॉलिवुडच्या सिनेमांमध्ये असे सीन सर्रास दाखविले जातात. हिरोने ३०-४० लोकांना एकाच फाईटमध्ये उडविले. बुक्का दिला तर गुंडाचे गाल हलले, दात पडले. एकाच फाईटमध्ये पार अगदी भिंतीवर जाऊन आदळणे, गाड्या उडतात आदी काहीही दाखविले जाते. हाच प्रश्न अनेकांच्या मुलांच्या मनात आला असेल, अनेकांनी त्यांच्या पालकांना विचारलेही असेल. त्यांना समजावताना पालकांच्याही मनात अनेक विचार आले असतील, परंतू मुलांना खरे आयुष्य आणि सिनेमात दाखविले जाते ते खोटे आयुष्याची जाण करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.