सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशला पळून जाणार होता; एका बुर्जीपावमुळे सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 19:35 IST2025-01-20T19:34:55+5:302025-01-20T19:35:25+5:30
Saif Ali Khan : शनिवारी रात्री पोलिसांना वरळीच्या सेंच्युरी मिलजवळ एका फुड स्टॉलवर बुर्जी पावाचे डिजिटल पेमेंट केलेले समजले. ते पोलिसांनी ट्रॅक केले.

सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशला पळून जाणार होता; एका बुर्जीपावमुळे सापडला
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान वर हल्ला करणाऱ्या आरोपीबाबत नवनवे खुलासे होत आहेत. कोर्टात एकीकडे आरोपीचे वकील तो बांगलादेशी नसल्याचा दावा करत असताना टीव्हीवर फोटो आल्यावर घाबरलेला आरोपी पुन्हा बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होता, असे समोर आले आहे.
शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर, असे या आरोपीचे नाव आहे. विजय दास या नावाने तो वावरत होता. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर त्याचा शोध लागला. फकीर हा बांगलादेशच्या झलोकाटीचा रहिवासी आहे. तो पाच महिन्यांपासून मुंबईत राहतो. छोटी मोठी कामे करत तो एका हाऊसकिपिंग एजन्सीसोबत काम करत होता.
त्याचे फुटेज मिळताच पोलिसांनी एडव्हान्स टेक्निकचा वापर केला. त्याला सर्व सीसीटीव्ही फुटेजवर शोधण्यात आले. नव्या टेक्निकने त्याला ९ जानेवारीला अंधेरीत एका मोटरसायकलवर पाहिले होते. तो ज्याच्या मोटरसायकलवर होता त्याचा शोधले गेले. त्याने तो त्याचा मालक होता असे सांगितले. यानंतर त्याचा मोबाईल नंबर मिळाला, तो पाळतीवर ठेवण्यात आला.
शनिवारी रात्री पोलिसांना वरळीच्या सेंच्युरी मिलजवळ एका फुड स्टॉलवर बुर्जी पावाचे डिजिटल पेमेंट केलेले समजले. ते पोलिसांनी ट्रॅक केले. डिजिटल फूटप्रिंटमुळे पोलिसांना ठाण्यातील त्याचे स्थान शोधण्यास मदत झाली. त्याच्या आजूबाजूला शोध पथके तैनात करण्यात आली. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील कामगार कॅम्पजवळ खारफुटीच्या परिसरात तो जमिनीवर पडलेला पोलिसांना सापडला.
चौकशीत त्याने न्यूज चॅनेल आणि सोशल मीडियावर त्याची प्रतिमा पाहून घाबरल्याचे सांगितले. तसेच बांगलादेशला परत पळून जाण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. गुन्ह्याच्या ठिकाणी असलेल्या डक्ट आणि वॉशरूमच्या खिडकीतून गोळा केलेले बोटांचे ठसे आरोपींच्या बोटांच्या ठशांशी जुळवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.