"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:58 IST2025-07-03T12:57:26+5:302025-07-03T12:58:43+5:30
एका चाहत्याने 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्यालाही असा अनुभव आला आहे का याबाबत विचारलं. तेव्हा अभिनेत्याने त्या चाहत्याला चोख उत्तर दिलं आहे.

"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
सिनेइंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक कलाकारांना भूमिका ऑफर करताना क्रॉम्प्रोमाइज करण्यासाठी सांगितलं जातं. मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनाही याचा अनुभव आला आहे. एका चाहत्याने 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्यालाही असा अनुभव आला आहे का याबाबत विचारलं. तेव्हा अभिनेत्याने त्या चाहत्याला चोख उत्तर दिलं आहे.
'ठरलं तर मग' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका. टीआरपीच्या शर्यतीतही कायम ही मालिका अव्वल असते. मालिकेतील सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना आवडते. त्याबरोबरच अर्जुनचा मित्र असलेला चैतन्यही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतो. 'ठरलं तर मग' मालिकेत चैतन्यची भूमिका अभिनेता चैतन्य सरदेशपांडे साकारत आहे. चैतन्य सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. चाहत्यांना अपडेट देण्यासोबतच तो त्यांच्या संपर्कात राहण्याचाही प्रयत्न करतो.
नुकतंच चैतन्यने त्याच्या काही चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. यामध्ये एका चाहत्याने त्याला "सिनेमा आणि मालिकेत काम मिळवण्यासाठी तुलादेखील कॉम्प्रोमाइज करावं लागलं का?", असा प्रश्न त्याला विचारला. या चाहत्याला त्याने चोख उत्तर दिलं आहे. "हो, मी माझ्या स्वप्नांच्या खुशीत झोपलो. रिजेक्शनसोबत कॉम्प्रोमाइज केलं. ही एक स्टोरी टेलिंग इंडस्ट्री आहे. कुठलं स्कँडल नाही जे तुम्हाला गॉसिप देईल", असं सडेतोड उत्तर अभिनेत्याने दिलं आहे.