लगीन घटीका समीप आली..! अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या मेहेंदी सेरेमनीचा व्हिडीओ व फोटो आले समोर

By तेजल गावडे | Updated: October 9, 2020 18:26 IST2020-10-09T18:24:57+5:302020-10-09T18:26:41+5:30

मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच तिचे मेहेंदी सेरेमनीचा व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत.

Video and photo of actress Sharmishtha Raut's Mehndi ceremony came in front | लगीन घटीका समीप आली..! अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या मेहेंदी सेरेमनीचा व्हिडीओ व फोटो आले समोर

लगीन घटीका समीप आली..! अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या मेहेंदी सेरेमनीचा व्हिडीओ व फोटो आले समोर

बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊतची लगीन घटीका समीप आली आहे. तिचा तेजस देसाईसोबत जून महिन्यात साखरपुडा पार पडला. या आनंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली होती. तिचा विवाह सोहळा 11 ऑक्टोबरला पार पडणार आहे.आता तिचे मेहंदी सेरेमनीचा व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. 

शर्मिष्ठा राऊतने मेहंदी सेरेमनीचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, हृदयावरती नाम तुझे मी कधीच कोरले, मेंदीच्या गंधात भारले, भेटीचे सोहळे. तसेच तिच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटोदेखील सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. 


काही दिवसांपूर्वी शर्मिष्ठा राऊतने लग्नाची तारीख जाहीर करत म्हटले की, आपण सगळ्यांनी मला आणि तेजसला मनापासून स्वीकारलेत याबद्दल आम्ही दोघेही कायम तुमचे ऋणी आहोत.आता तुमच्या आणि वडीलजणांच्या आशीर्वादाने आम्ही 11 ऑक्टोबर, 2020 रोजी लग्नाची गाठ बांधणार आहोत. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर सदैव राहोत.

तेजस हा 'बोस' कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर आहे. शर्मिष्ठाने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शर्मिष्ठाने सांगितले की, 'आमचे अरेंज मॅरेज असले, तरी हे 'लव्ह मॅरेज' आहे असेच मी म्हणेन. माझी बहीण सुप्रियाने आमची ओळख करुन दिली. त्याला पहिल्या भेटीतच मी आवडले होते. त्याने मला लग्नाची मागणी घातली, पण मी थोडा वेळ घेतला. काही महिन्यांनी होकार दिला.'दिल तो पागल है' सिनेमासारखे फिल्मी काहीसे झाले. तुम्हाला ते आतून वाटते… हाच आपला 'मिस्टर राईट' आहे, याचा कौल अंतर्मनाने मला दिला.'


तिने पुढे सांगितले की, तेजस फार मालिका पाहत नाही. त्यामुळे मी कोण आहे, हेच त्याला माहित नव्हते. अर्थात माझीही तीच अट होती. त्याने माणूस म्हणून मला आधी ओळखावे. मग माझी अभिनेत्री म्हणून त्याला ओळख व्हावी. माझे स्थळ गेल्यावर त्याने माझा 'चि व चि. सौ. का.' हा चित्रपट पाहिला, नंतर काही मालिका वेबवर पाहिल्या. त्याला माझ्या क्षेत्राचा, इथल्या वेळांचा अंदाज आहे. तो फोक डान्सर म्हणून शो करायचा. त्याचे काही मित्रही या क्षेत्रात आहेत. त्यामुळे वेगळे क्षेत्र असून जुळवताना फारशा अडचणी आल्या नाहीत. त्याला सोशल मीडिया, लोकांशी संपर्क साधणे, हे कसे जुळवून घेता येईल, याबाबत मला साशंकता होती. पण त्याने फारच छान जमवून घेतले आहे याचा मला आनंद आहे.


शर्मिष्ठाने 'मन उधाण वाऱ्याचे‘मधील साकारलेली नीरजा ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीम गाठी‘मध्ये तिने अर्चनाची व्यक्तिरेखा साकारली होती. कुंपण ,सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी या मालिकांमध्ये देखील शर्मिष्ठा झळकली होती.

मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील तिने उत्तम कामगिरी बजावली. जो भी होगा देखा जयेगा, टॉम अँड जेरी, बायको असून शेजारी, शंभू राजे या नाटकात तिने काम केले आहे. दे धक्का, फक्त लढ म्हणा, ची व ची सौ कां , काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील तिने भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: Video and photo of actress Sharmishtha Raut's Mehndi ceremony came in front