"हिला काय कळतंय? ही मूर्ख आहे...", गावावरुन आलेल्या माधवीला हिणवायचे लोक, म्हणाली- "मला नातेवाईकांनीही..."
By कोमल खांबे | Updated: October 17, 2025 12:30 IST2025-10-17T12:29:04+5:302025-10-17T12:30:54+5:30
इंडस्ट्रीतही माधवीला खूप स्ट्रगल करावा लागला. गावाहून आलेल्या माधवीला तिच्या नातेवाईकांनीही सुरुवातीला हिणवलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत माधवीने याबाबत सांगितलं.

"हिला काय कळतंय? ही मूर्ख आहे...", गावावरुन आलेल्या माधवीला हिणवायचे लोक, म्हणाली- "मला नातेवाईकांनीही..."
माधवी निमकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. माधवीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील तिने साकारलेली 'शालिनी' प्रेक्षकांना प्रचंड भावली. या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. पण, इंडस्ट्रीतही माधवीला खूप स्ट्रगल करावा लागला. गावाहून आलेल्या माधवीला तिच्या नातेवाईकांनीही सुरुवातीला हिणवलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत माधवीने याबाबत सांगितलं.
माधवीने 'मज्जा पिंक' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत माधवी म्हणाली, "मी पूर्वीच्या माधवीला खूप मिस करते. या माधवीकडे आधी काही नव्हतं तरीही ती खूश होती. आपली परिस्थिती फार चांगली नाही हे तिला माहीत होतं. तिची कोणत्याच बाबतीत काहीच तक्रार नव्हती. आईवडिलांकडेही नाही... आजही माझी कोणाकडून काहीच अपेक्षा नाही. ते दिवस खूप सुंदर होते. मी देवाला प्रार्थना करते की देवाने समजा कधी विचारलंच की तुला काय हवंय... तर मी देवाला म्हणेन की देवा हे दिवस परत दे. जग न बघितलेलंच बरं...हे जग खूप विचित्र आहे".
"मी तेव्हा इतकी बावळट होते. ते शहाणपण यायला मला चाळीशी गाठावी लागली. त्यामुळे मला असं वाटतं की ते जग देवाला दाखवायचं असेल तर ती मुलगी तितकी स्ट्राँग आणि हुशार असावी. म्हणजे येणारे जे अडथळे असतात त्याचा परिणाम होत नाही. मी गावाकडून आलेले त्यामुळे मला सगळ्यांनी हिणवलं. हिला काय कळतंय, हिला अक्कल आहे का? ही मूर्ख आहे हे सगळं मी ऐकत आलीये. माझ्यासाठी टास्क होता की माधवी कोणाकडे लक्ष देऊ नकोस. स्वत:कडे लक्ष दे...माझ्या नातेवाईकांनीही हे केलं", असंही तिने सांगितलं.
पुढे माधवी म्हणाली, "माझ्यात सगळ्यात निगेटिव्ह पॉइंट हा होता की विसरभोळेपणा. थोड्याफार प्रमाणात आजही आहे. पण मी काय करू? मी कोणालाही आजपर्यंत उत्तर नाही दिलं. मी बाथरुममध्ये जाऊन रडायचे की मलाच का बोलतात. पण, मी चॅलेंज घेतलं की माधवी कामच असं कर की सगळ्यांची तोंडं बंद होतील. पण, माझं टार्गेट कधीच असं नव्हतं की मी श्रीमंत असली पाहिजे. किंवा माझ्याकडे पैसा असला पाहिजे. किंवा मोठ्या गाड्या असल्या पाहिजेत. ते नशिबात असेल तर देव देईल. पण मी काम किती केलंय, कसं केलंय ही माझी श्रीमंती आहे".