प्राजक्ता माळीची ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 14:25 IST2023-03-31T14:24:25+5:302023-03-31T14:25:34+5:30
प्राजक्ता माळीने या मालिकेतून तब्बल ६ वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक केले आहे.

प्राजक्ता माळीची ही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
सोनी मराठी वाहिनीवरील ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ (Post Office Ughada Aahe) या वेगळ्या धाटणीच्या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. नव्वदच्या दशकातला पोस्ट ऑफीसचा काळ या मालिकेत दाखवल्याने प्रेक्षकही स्मरणात रमले. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून रविवार, २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.
९० चं दशक म्हणजे मंतरलेला काळ होता. या जादूई काळाची मोहिनी पुन्हा अनुभवता यावी आणि नवीन पिढीला त्या काळाची ओळख पटावी या हेतूने ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका ५ जानेवारीपासून सुरू झाली. या मालिकेमध्ये समीर चौघुले, दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे, ईशा डे, पृथ्वीक प्रताप, आशुतोष वाडेकर याबरोबरच ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत दिसून आले.
तसेच मालिकेच्या शेवटी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीचीही एंट्री झाली. तब्बल ६ वर्षांनी तिने मालिकाविश्वात पदार्पण केले. संगणक प्रशिक्षक म्हणून आलेली पूजा गायकवाड ही व्यक्तिरेखा प्राजक्ताने साकारली असून तिला मालिकेत पाहण्याची संधी मिळत असल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. पोस्टात संगणक येण्याने आधीच सर्वांच्या कामात गोंधळ निर्माण झाले आहेत. त्यात आता पोस्टात प्राजक्ताची एंट्री झाल्यामुळे आणखी काय गंमत पाहायला मिळणार तसेच पारगाव पोस्टाची अंतिम परीक्षा कशी असेल, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरेल.
सध्या टेलिव्हिजन विश्वात सुरू असणाऱ्या इतर मालिकांपेक्षा वेगळा विषय आणि हलकीफुलकी मालिका म्हणून गेले तीन महिने ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. नव्वदीच्या दशकातलं पोस्टाचं भावविश्व उलगडणारी ही मालिका गेले तीन महिने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतेय. १९९७ च्या काळातलं पोस्ट ऑफीस, तिथलं कामकाज, येणाऱ्या अडचणी, विविध मानवी स्वभाव आणि त्यांतून तयार होणारे विनोद प्रेक्षकांना भावले. सुरुवातीपासून मालिकेच्या टीमकडून सांगण्यात आलं होतं की, ही मालिका ४० भागांचीच असेल आणि त्याप्रमाणे येत्या रविवारी रात्री ९ वाजता ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.