"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:27 IST2025-12-26T13:21:21+5:302025-12-26T13:27:23+5:30
Abhijeet Sawant's big revelation after winning 'Indian Idol' : २००४ मध्ये 'इंडियन आयडल'चा पहिला सीझन जिंकून अभिजीत सावंत रातोरात नॅशनल सेंसेशन बनला होता. संपूर्ण देश त्याच्या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना, खुद्द अभिजीत मात्र एका वेगळ्याच दहशतीखाली होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीतने यामागचे धक्कादायक कारण स्पष्ट केले आहे.

"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
२००४ मध्ये 'इंडियन आयडल'चा पहिला सीझन जिंकून अभिजीत सावंत रातोरात नॅशनल सेंसेशन बनला होता. संपूर्ण देश त्याच्या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना, खुद्द अभिजीत मात्र एका वेगळ्याच दहशतीखाली होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीतने यामागचे धक्कादायक कारण स्पष्ट केले आहे.
'गाना'ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतने सांगितले की, 'इंडियन आयडल'चा पहिला सीझन जिंकल्यानंतर त्याला आनंद तर होताच, पण त्यासोबतच भविष्याची मोठी भीती वाटत होती. त्याला वाटले होते की, एखादी मोठी म्युझिक कंपनी त्याला दीर्घकालीन कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवून ठेवेल आणि त्यातून त्याचे करिअर उद्ध्वस्त होईल. अभिजीत म्हणाला, "२० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण मला आठवतंय की मला शो जिंकण्याचा पूर्ण विश्वास होता. मात्र, त्याच वेळी भविष्याबद्दल खूप दडपण होते. हे 'बिग बॉस'सारखं नव्हतं, जिथे तुम्हाला बाहेरच्या जगाचा पत्ता नसतो. मी लोकांना माझ्यासाठी वेडं होताना आणि मुलींना माझ्यावर फिदा होताना प्रत्यक्ष पाहत होतो. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत मी कोपऱ्यात बसून चहा प्यायचो आणि अचानक अख्खा देश मला ओळखू लागला होता."
"लोकांच्या हेतूवर व्हायचा संशय"
अभिजीतने पुढे सांगितले की, त्या काळी आजच्या पिढीसारखा आत्मविश्वास नव्हता. तो म्हणाला, "शो संपल्यानंतर आमच्या हातात काय येईल, हे आम्हाला माहीत नव्हतं. त्या काळात जो कोणी आम्हाला जास्त पैसे ऑफर करायचा, त्याच्या हेतूवर आम्हाला संशय यायचा. आम्हाला वाटायचं की हे लोक आमची फसवणूक तर करत नाहीत ना? अगदी शो जिंकण्यापूर्वी जेव्हा मला कॉन्ट्रॅक्ट मिळणार होते, तेव्हा माझ्या कुटुंबातील अनेकांनी सांगितलं होतं की, कोणत्याही अल्बमच्या कॉन्ट्रॅक्टवर सही करू नकोस. मला भीती होती की ते मला अशा एखाद्या करारात अडकवून ठेवतील ज्यामुळे माझे आयुष्यातील सर्वोत्तम ५-१० वर्षे वाया जातील आणि नंतर ते मला सोडून देतील."
शो जिंकल्यानंतर पूर्ण आयुष्यच बदलले
विजेता झाल्यानंतरच्या आठवणी सांगताना अभिजीत सावंत म्हणाला, "शो जिंकल्यानंतर सगळंच बदललं. मी वेळेवर घरी जाऊ शकत नव्हतो कारण घराबाहेर मला भेटण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी असायची. माझ्या मित्रांच्या मते असा वेडेपणा खूप कमी लोकांनी पाहिला आहे. सुरुवातीला वाटलेली भीती कालांतराने दूर झाली. मी ५-६ वर्षे 'सोनी'शी जोडला गेलो होतो. तुमचे संबंध चांगले असतील तर कंपन्या तुम्हाला मोठ्या उंचीवर नेऊ शकतात, हे मला नंतर समजले." अभिजीत सावंतला 'मोहब्बतें लुटाऊंगा', 'मर जावां मिट जावां' (आशिक बनाया आपने) आणि 'हॅपी एंडिंग' (तीस मार खान) सारख्या हिट गाण्यांमुळे मोठी लोकप्रियता मिळाली होती. आजही तो मराठी आणि हिंदी संगीत विश्वात तितकाच लोकप्रिय आहे.