"माय घरात असताना प्रचंड सुख असतं आणि...", माधवी निमकरची आईसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:42 IST2025-12-29T15:41:59+5:302025-12-29T15:42:47+5:30
Madhavi Nimkar : माधवी निमकरने नुकतेच सोशल मीडियावर आईचा एक व्हिडीओ शेअर करत खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

"माय घरात असताना प्रचंड सुख असतं आणि...", माधवी निमकरची आईसाठी खास पोस्ट
माधवी निमकर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. ती छोट्या पडद्यावरची खलनायिका म्हणून प्रसिद्ध आहे. माधवी तिच्या अभिनयासोबत फिटनेससाठी ओळखली जाते. याशिवाय ती सोशल मीडियावर सक्रीय असून पोस्ट शेअर करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर आईचा एक व्हिडीओ शेअर करत खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
माधवी निमकरने सोशल मीडियावर आईचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती लाडू बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ''माझी माय गं...!! मला तुझा हातचे मेथीचे लाडू आवडतात म्हणुन नेहमी न चुकता न विसरता माझा साठी बनवतेस.. दादा घरी येणार असेल तर त्याचा सोबत नेहमी पाठवून देतेस.. तुझ्यासाठी मी लहानच आहे आणि मला पण लहानच राहायचंय, माय घरात असताना प्रचंड सुख असतं आणि बाप घरात असताना घरात शांती असते..किती सुरक्षित वाटतं!!''
''खरं आहे , जगात आई बाबांची जागा कोणीही घेऊ शकत नाही !! आई बापा सारखं प्रेम तुम्हाला जगात कोणीही देऊ शकत नाही, म्हणून जेवढं दोघांना सुखात ठेवता येईल तेवढं ठेवा कारण त्यांची सेवा करण्यात जे समाधान मिळेल ते दुसरीकडे कुठेही मिळणार नाही'', असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नवीन मालिकेबद्दल अभिनेत्री म्हणाली...
माधवी निमकर लवकरच स्टार प्रवाहच्या तुझ्या सोबतीने या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती पुन्हा एकदा खलनायिका साकारणार आहे. या मालिकेबद्दल ती म्हणाली की, ''तुझ्या सोबतीने मालिकेतल्या तायडी या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा त्या भूमिकेचं वेगळेपण मला भावलं. आधीच्या पात्रापेक्षाही आणखी छान पद्धतीने व्यक्तिरेखा कशी रंगवता येईल याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तायडी इतरांना गिल्ट देऊन त्यांच्याकडून काम करुन घेण्यात तरबेज आहे. तिचा नशिबावर अजिबात विश्वास नाही. तिच्या मते आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवायची असते. नशिबावर सोडायची नसते. प्रचंड फिटनेस फ्रिक असलेल्या तायडीला खाण्यात पदार्थाच्या जागी कॅलरीज दिसतात. खऱ्या आयुष्यातही मी फिटनेसला खूप महत्त्व देते. त्यामुळे तायडी आणि माझ्या खऱ्या आयुष्यातलं फिटनेस प्रेम छान जमून आलं आहे. नव्या वर्षाची सुरुवात नव्या मालिकेने आणि नव्या पात्रासह होणार आहे. प्रेक्षकांचं या भूमिकेलाही प्रेम मिळावं अशी इच्छा आहे.''