"तेव्हा सिनेइंडस्ट्रीला टेलिव्हिजननं तारलं...", मालिकाविश्वावर टीका करणाऱ्यांना तेजश्री प्रधाननं सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:26 IST2025-10-01T10:25:00+5:302025-10-01T10:26:02+5:30
Tejashree Pradhan : तेजश्री प्रधान सतत चर्चेत येत असते. ती तिचे मत रोखठोकपणे मांडत असते. टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर होणाऱ्या टीकेवर तेजश्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

"तेव्हा सिनेइंडस्ट्रीला टेलिव्हिजननं तारलं...", मालिकाविश्वावर टीका करणाऱ्यांना तेजश्री प्रधाननं सुनावलं
तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. तिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले. तेजश्री सतत चर्चेत येत असते. ती तिचे मत रोखठोकपणे मांडत असते. टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर होणाऱ्या टीकेवर तेजश्रीने प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर खूप टीका होतेय. यावर अभिनेत्रीने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आपले मत मांडले आहे. ती म्हणाली की,"जेव्हा ती मालिकेत काम करत होती, तेव्हा तिच्या दुसऱ्या नाटकात प्रशांत दादा (प्रशांत दामले) तिच्यासोबत होते. नाटकाचे जवळपास २०-२२ प्रयोग झाल्यानंतर प्रशांत दादा सहजपणे बोलून गेले होते, 'तेजू, जे माध्यम आपल्याला बोलावते, त्याकडे कधीही पाठ फिरवायची नाही.' तेजश्री सांगते की, ते वाक्य आणि तो दिवस तिच्या कायम लक्षात राहिला. तिच्या मते, टेलिव्हिजन हे माध्यम तिच्यासाठी अत्यंत योग्य ठरलं आहे आणि भविष्यातही ते तिला नक्कीच बोलवेल याची तिला खात्री आहे. म्हणूनच तिने आजपर्यंत या माध्यमाकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही."
टेलिव्हिजनमधील कामाचा वेग
टेलिव्हिजनमध्ये काम करण्याच्या वेगाबद्दल बोलताना तेजश्रीने सुबोध दादाच्या (सुबोध भावे) एका मताशी सहमती दर्शवली. ती म्हणाली की, जे कलाकार केवळ चित्रपटांमध्ये काम करतात, त्यांची जेव्हा टेलिव्हिजन सेटवर गाठ पडते, तेव्हा त्यांची धांदल उडते. कारण, त्यांना सांगितले जाते की, "हा घ्या सीन, पंधरा मिनिटांत शॉट तयार होईल!" मालिकांमध्ये दिवसाला १५ ते २० सीन करणे सामान्य आहे. कधीकधी कलाकारांना सलग दोन पाने असलेले संवाद बोलायचे असतात आणि विशेष म्हणजे, तो सीन सेटवर आल्यावर लिहिला जातो, किंचित बदलला जातो. दिग्दर्शकाला मदत करायची असते, पण त्याच्यासमोर वेळेचे दडपण आणि इतरही गोष्टी असतात. त्यामुळे कलाकार सतत विचारात असतो, "तयार आहेस का? करूया का?" यामुळे, मालिका विश्व तुमच्या मेंदूच्या विचार आणि प्रक्रिया करण्याच्या वेगाला जो स्पीड देतं, तो पेलणे सोपे नाही.
माध्यमाची समज आणि महत्त्व
तेजश्रीने माध्यमाच्या समजबद्दलही मत मांडले. ती म्हणाली की, टेलिव्हिजनमध्ये कदाचित चित्रपटांइतका तार्किक विचार केला जात नसेल, पण कदाचित हा विचार केला जात असेल की, "इतका लॉजिकली विचार न करणारी माणसे हे माध्यम पाहतात." त्यामुळे, त्यांना जेवढे सहज लॉजिक पचवता येईल, तेवढेच दिले जाते. टीव्ही माध्यमाबद्दल अनेकदा सहजपणे आणि कमी लेखून बोलले जाते, पण कोरोनाच्या काळात टेलिव्हिजनने प्रत्येक इंडस्ट्रीला तारले होते. तुमचा कोट्यवधींचा सिनेमा प्रमोट करण्यासाठी तुम्हाला टीव्हीवर यावे लागते, याचा अर्थ हे माध्यम तुम्हाला जितके 'अप्रगल्भ' किंवा 'साधे' वाटते, तितके ते नक्कीच नाहीये.