न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकली पहिली मराठी मालिका, 'कमळी' उर्फ विजया बाबर म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:06 IST2025-09-29T17:05:14+5:302025-09-29T17:06:16+5:30
Kamali Serial : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'कमळी'चा कबड्डी विशेष प्रोमो थेट अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे.

न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकली पहिली मराठी मालिका, 'कमळी' उर्फ विजया बाबर म्हणाली...
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'कमळी'(Kamali Serial)चा कबड्डी विशेष प्रोमो थेट अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे. यामुळे कमळी ही टाईम्स स्क्वेअरवर झळकणारी पहिली मराठी मालिका ठरली असून, महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ कबड्डी आणि मराठी संस्कृती यांचा जागतिक व्यासपीठावर गौरव झाला आहे. कबड्डी हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे. ताकद, चातुर्य आणि संघभावना दर्शवणारा हा खेळ ‘कमळी’ मालिकेत प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. या विशेष भागात टीम कमळी (विजया बाबर) आणि टीम अनिका (केतकी कुलकर्णी) यांच्यातील थरारक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या ऐतिहासिक क्षणाबद्दल कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर म्हणाली, '''कमळी' माझ्यासाठी केवळ एक भूमिका नाही, तर ती माझ्या आयुष्यातील एक प्रेरणादायी प्रवास आहे. एका सामान्य गावाकडच्या मुलीची स्वप्नं, तिचा संघर्ष, आणि जिद्दीनं पुढं जाण्याची तयारी हे सगळं मी कमळीच्या माध्यमातून अनुभवत आहे. आज ही कथा थेट न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकते आहे, ह्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ही केवळ माझी नाही, तर हजारो मराठी मुलींची गोष्ट आहे, जी आता जगभर पोहोचते आहे. झी मराठी आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार, ज्यांनी कमळीला एवढं मोठं व्यासपीठ दिलं. आज खरंच वाटतंय जग जिंकण्याची सुरुवात आपल्या मातीपासून होते.''
ही संपूर्ण मोहीम म्हणजे संस्कृती, खेळ, परंपरा यांचा सुरेख संगम आहे. कमळीचा प्रोमो टाईम्स स्क्वेअरसारख्या जागतिक स्तरावर झळकणं हा मराठी अस्मितेचा जगभरात झालेला सन्मान आहे.