विश्वास बसत नाहीये...; पूर्णा आजींच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाले- "कालच्या एपिसोडमध्येच पाहिलं आणि आज..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:56 IST2025-08-16T19:55:47+5:302025-08-16T19:56:23+5:30
Jyoti Chandekar Death : पूर्णा आजींचं निधन झालं यावर चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. 'ठरलं तर मग'च्या काल(शुक्रवारी) प्रसारित झालेल्या दहीहंडी विशेष भागात पूर्णा आजी दिसल्या होत्या.

विश्वास बसत नाहीये...; पूर्णा आजींच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाले- "कालच्या एपिसोडमध्येच पाहिलं आणि आज..."
'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेजस्विनी पंडितची आई ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. त्या ६८ वर्षांच्या होत्या. प्रकृती बिघडल्याने गेल्या ३-४ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील का खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण अखेर आज त्यांची दुपारी ३-४ वाजताच्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
पूर्णा आजींच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाबाबत स्टार प्रवाहच्या ऑफिशियल सोशल मीडियावरुन पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. पण, पूर्णा आजींचं निधन झालं यावर चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. 'ठरलं तर मग'च्या काल(शुक्रवारी) प्रसारित झालेल्या दहीहंडी विशेष भागात पूर्णा आजी दिसल्या होत्या. त्यामुळे यावर विश्वास ठेवणं त्यांना कठीण जात आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी ज्योती चांदेकरांना मिस करू असं म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "हे धक्कादायक आहे", "कसं शक्य आहे बापरे...", "हे कसं काय झालं? कालच त्यांना दहीहंडीच्या कार्यक्रमात बघितलं होतं", "पूर्णा आजी तुमची खूप आठवण येईल...", "यावर विश्वास बसत नाहीये" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
ज्योती चांदेकर यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. २०० हून अधिक पुरस्कार त्यांनी नावावर केले होते. आईच्याच पावलावर पाऊल ठेवत तेजस्विनी पंडित हिनेदेखील अभिनयात करिअर करायचं ठरवलं. ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.