तेजस्विनी लोणारीने सांगितला स्वामींचा अनुभव, म्हणाली "त्यांची प्रचिती मला आली"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:59 IST2025-11-09T14:56:12+5:302025-11-09T14:59:18+5:30
तेजस्विनी लोणारीने स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रचिती देणारा एक अविस्मरणीय अनुभव शेअर केला आहे.

तेजस्विनी लोणारीने सांगितला स्वामींचा अनुभव, म्हणाली "त्यांची प्रचिती मला आली"
मराठी इंडस्ट्रीतील बहुतेक कलाकारांची स्वामींवर श्रद्धा आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर, सुरेखा कुडची, तेजस्विनी पंडित, सुकन्या मोने, स्वाती देवल आणि जयंत वाडकर यांसारख्या अनेक लोकप्रिय कलाकारांनी वेळोवेळी स्वामींवरील आपली अपार श्रद्धा व्यक्त केली आहे. याच निष्ठावान भक्तांमध्ये अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) हिचाही समावेश आहे. तेजस्विनी लोणारी ही स्वामी समर्थांची खूप मोठी भक्त आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, तेजस्विनी लोणारीने स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रचिती देणारा एक अविस्मरणीय अनुभव शेअर केला आहे.
तेजस्विनी लोणारीनंही 'राजमंच' या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तेजस्विनीला "तुला स्वामींचे काही अनुभव आले का?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तेजस्विनीनं तिला स्वामी समर्थांनी लहान-मोठ्या प्रत्येक संकटात कशी मदत केली, याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, "छोट्यांपासून-मोठ्यांपर्यंत... मी नुकतेच नवीन घर घेतले, तेव्हा घरासाठीचे कर्ज मंजूर होत नव्हते. मला त्याची खूप गरज होती. मी स्वामींना मनोमन म्हटले की, 'आता हे काम तुम्हीच करायचे आहे' आणि माझ्या प्रार्थनेनंतर ते कर्ज मंजूर झाले".
पुढे ती म्हणाली, "मी त्यांच्यावर खूप प्रेम करते, पण मी त्यांच्यासोबत हक्काने भांडतेसुद्धा. पालखीच्या दिवशीच एक घटना घडली आणि त्या घटनेनंतर अवघ्या दोन महिन्यांत मी एक पूर्णपणे वेगळी तेजस्विनी म्हणून बाहेर आले". तेजस्विनीच्या मते, जेव्हा कधी ती मानसिकरित्या अस्वस्थ होते, तेव्हा स्वामींच्या कृपेने तिला एक नवी आणि वेगळी ऊर्जा मिळते. ती म्हणाली, "प्रत्येक वेळी मला अस्वस्थता जाणवल्यानंतर मी एका वेगळ्याच (उच्च) स्तरावर पोहोचते. मला त्यांची प्रचिती आलेली आहे".
तिने अलीकडील दुखापतीनंतरचा अनुभव सांगताना म्हटले, "या दुखापतीनंतर मला पूर्णपणे समजले आहे की, ते माझ्यासोबत नेहमी आहेत. मला त्यांच्याकडून कोणतेही भौतिक सुख किंवा वस्तू नको आहेत, फक्त त्यांनी माझ्यासोबत राहावे". शेवटी ती म्हणाली, "मागितले की ते देतात, स्वामी माझे खूप ऐकतात".
तेजस्विनी लोणारीचं लग्न कधी?
तेजस्विनी लोणारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नुकताच तिचा साखरपुडा झाला आहे. तेजस्विनी लोणारी राजकीय कुटुंबाची सून होणार आहे. शिवसेना युवानेते समाधान सरवणकर यांच्यासोबत तिने साखरपुडा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे ते सुपुत्र आहेत.