अभिनयानंतर आता उद्योजिका! मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश 'या' व्यवसायात उतरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:59 IST2025-11-14T18:54:12+5:302025-11-14T18:59:56+5:30
एका यशस्वी अभिनेत्रीनंतर आता ती यशस्वी बिझनेसवुमन बनली आहे.

अभिनयानंतर आता उद्योजिका! मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश 'या' व्यवसायात उतरली
'बिग बॉस १५' ची विजेती आणि 'नागिन' फेम मराठमोळी तेजस्वी प्रकाश हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये मुख्य नायिकांची भूमिका साकारली आहे. तेजस्वीने आता अभिनयाच्या दुनियेसोबतच व्यावसायिक जगातही मोठी झेप घेतली आहे.
तेजस्वीने नुकताच 'सॅम'ज सलोन' (Sam's Salon) नावाचे स्वतःचे आलिशान ब्युटी सलून (Beauty Salon) उघडले आहे. तेजस्वीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून सलूनच्या उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचे आई-वडील आणि प्रियकर करण कुंद्रादेखील दिसून आले. तसेच इंडस्ट्रीतील तिचे अनेक मित्र-मैत्रिणींनी तिच्या सलूनला आवर्जून भेट देत शुभेच्छा दिल्या.
अभिनय क्षेत्रात यशस्वी असतानाही व्यावसायिक जगात पाऊल टाकण्यामागचं कारण तेजस्वीने कॉमेडियन भारती सिंहशी बोलताना उघड केलं. तेजस्वी म्हणाली, "मला अभिनय खूप आवडतो, पण मी पूर्णपणे अभिनय क्षेत्रावर अवलंबून राहू शकत नाही". ती पुढे म्हणाली की, "असं गरजेचं नाही की ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, त्यांनाही तुम्ही आवडायलाच हवे".
पुढे तिने सांगितले की, "जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा देव तुम्हाला साथ देतो". तेजस्वीने आनंद व्यक्त करत म्हटले की, "आता माझा एक नवीन प्रवास सुरू झाला आहे आणि माझ्या व्यवसायाला चांगला प्रतिसादही मिळत आहे". तेजस्वी प्रकाशने स्वतःच्या मेहनतीने आणि लोकप्रियतेच्या बळावर आपले स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनयासोबतच हा व्यवसाय सांभाळणे हे तिच्यासाठी एक नवीन आव्हान असणार आहे.