भक्ताच्या रक्षणासाठी स्वामी घेणार विराट रुप, 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत दिसणार अजस्त्र नृसिंह अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:40 IST2025-12-26T16:40:37+5:302025-12-26T16:40:58+5:30
स्वामीभक्तीची अनुभूती आणि स्वप्नपूर्तीचा मार्ग दाखवणारी लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ या महारविवारी प्रेक्षकांसाठी एक अतिशय भावनिक स्वामी अनुभव घेऊन येत आहे.

भक्ताच्या रक्षणासाठी स्वामी घेणार विराट रुप, 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत दिसणार अजस्त्र नृसिंह अवतार
स्वामीभक्तीची अनुभूती आणि स्वप्नपूर्तीचा मार्ग दाखवणारी लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ या महारविवारी प्रेक्षकांसाठी एक अतिशय भावनिक स्वामी अनुभव घेऊन येत आहे. अन्याय, भीती आणि संकटांच्या गर्तेत सापडलेल्या वीणासाठी स्वामी स्वतः पुढे येणार असून, भक्तांच्या रक्षणासाठी ते किती अजस्त्र रूप धारण करू शकतात, याचा प्रत्यय या विशेष भागात येणार आहे. कलियुगात, अन्याय, अहंकार आणि कटकारस्थानांच्या छायेत अडकलेल्या एका कुटुंबाच्या संघर्षाचा अंतिम टप्पा या भागात उलगडणार आहे.
काका रणजीतच्या कारस्थानांमुळे वीणा जीवघेण्या संकटात सापडते. एका क्षणी तिचा शेवट जवळ आला आहे, असं वाटत असतानाच स्वामी तिच्या पाठीशी उभे राहतात. उलगडतो असा एक टप्पा जो विस्मयचकित करणारा आहे. भक्तांच्या स्वप्नांच्या आड येणाऱ्यांना रोखण्यासाठी, स्वामींचं रूप अधिकच विराट होत जाणार आहे. वीणाच्या रक्षणासाठी स्वामी नृसिंह अवतार घेणार आहेत. मात्र नेमकं काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना महारविवारची वाट पाहावी लागणार आहे.
भक्ती, श्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शक्ती यांचा संगम असलेला हा विशेष भाग प्रेक्षकांना भावनिक आणि दृश्यात्मक अनुभव देणार आहे. वीणाचं पुढे काय होणार? रणजीतच्या मनसुब्यांना आळा बसेल का? आणि स्वामींचं हे विराट रूप नेमकं काय संदेश देणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उलगडतील येत्या महारविवारी. ‘जय जय स्वामी समर्थ – वसा स्वामीभक्तीचा, मार्ग स्वप्नपूर्तीचा’ खास भाग येत्या रविवारी २८ डिसेंबरला रात्री ८ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.