Mulgi Zali Ho : तुमचे लेखक सुट्टीवर गेलेत का? ‘मुलगी झाली हो’ मालिका झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 18:35 IST2022-08-16T18:35:26+5:302022-08-16T18:35:57+5:30
Mulgi Zali Ho : ‘मुलगी झाली हो’ मालिका प्रेक्षकांच्या निशाण्यावर आली आहे. मालिकेचा सध्या सुरू असलेला ट्रॅक पाहून प्रेक्षकवर्ग भडकला आहे.

Mulgi Zali Ho : तुमचे लेखक सुट्टीवर गेलेत का? ‘मुलगी झाली हो’ मालिका झाली ट्रोल
मराठी मालिकांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. हा प्रेक्षक मायबाप मालिकांवर प्रचंड प्रेम करतो. पण प्रसंगी संतापतो देखील. होय, मालिकांमध्ये तेच ते कथानक, मनाला न पटणारी दृश्य, अतिशयोक्ती दाखवली की प्रेक्षक नाराज होतात. सध्या अशीच एक मालिका प्रेक्षकांच्या निशाण्यावर आली आहे. होय, मालिकेचा सध्या सुरू असलेला ट्रॅक पाहून प्रेक्षकवर्ग भडकला आहे. या मालिकेचं नाव आहे ‘मुलगी झाली हो’ ( Mulgi Zali Ho). प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यातच ही मालिका लोकप्रिय झाली होती. अगदी टीआरपी चार्टवर पहिल्या पाचमध्ये होती. पण गेल्या काही महिन्यांत या मालिकेनं प्रेक्षकांची निराशा केली आहे. सध्या मालिकेत वेगळाच ट्रॅक सुरू आहे.
मालिकेतील मुख्य नायिका साजिरी प्रेग्नंट आहे. मात्र साजिरीच्या गर्भात वाढणारं बाळ आपलं नाही, असं शौनक म्हणत आहे. मालिकेतील हे कथानक पाहून प्रेक्षक संतापले आहेत. कारण यापूर्वी हेच कथानक याच वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दाखवण्यात आलं होतं.
तुम्हाला आठवत असेल तर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा आणि कार्तिक यांच्यात असंच कथानक दाखवण्यात आलं होतं. दीपाला जुळी मुलं होणार होती. मात्र कार्तिकने तिच्यावर संशय घेत हे मूल आपलं नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे दीपाने मुलांना एकटीने वाढवायचा निर्णय घेतला होता. आता ‘मुलगी झाली हो’ मालिकेत देखील नेमका हाच ट्रॅक दाखवला जात आहे. त्यामुळे एकाच वाहिनीवरील दोन मालिकांचं कथानक सेम कसं असू शकतं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे अनेकांनी ही मालिका बंद करा, अशी मागणी केली आहे.
अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुमच्या लेखकांना दुसरं काही सुचत नाही का? सगळ्या मालिकांमध्ये असंच कसं घडतं? असा सवाल एका चाहत्याने केला आहे. अरेच्चा, दीपाच्या जागी आता साजिरी आहे आणि कार्तिकच्या जागी शौनक बाकी काहीच फरक नाही, तुमचे लेखक सुट्टीवर गेलेत का? अशी कमेंट एका युजरने केली आहे.