सोनाली कुलकर्णी कोणासोबत झळकणार छोट्या पडद्यावर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 17:36 IST2016-10-21T10:52:44+5:302016-10-21T17:36:00+5:30
दिवाळी हा सण उत्साहाचा, जल्लोषाचा आणि सुख समृद्धीचा. रोषणाई, आकाशकंदील, फराळ म्हणजे दिवाळी. सारं वातावरण मंगलमय आणि आसमंतात फक्त आनंदी आनंद म्हणजे ...
सोनाली कुलकर्णी कोणासोबत झळकणार छोट्या पडद्यावर?
द वाळी हा सण उत्साहाचा, जल्लोषाचा आणि सुख समृद्धीचा. रोषणाई, आकाशकंदील, फराळ म्हणजे दिवाळी. सारं वातावरण मंगलमय आणि आसमंतात फक्त आनंदी आनंद म्हणजे दिपावली. तेजपर्व दिवाळीचा हाच उत्साह घरोघरी पाहायला तर मिळतो. याच उत्साहापासून छोटा पडदा तरी कसा दूर राहिल. छोट्या पडद्यावरही प्रकाशाचे पर्व असलेल्या दिवाळीचे जोरदार सेलिब्रेशन केले जाते. महाराष्ट्राचा महामंच कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवरही दिवाळीचे स्पेशल सेलिब्रेशन करण्यात आले. कोण होईल मराठी करोडपती या शोच्या माध्यमातून कायमच गरजूंना आणि आर्थिक निकड असलेल्या व्यक्तींना मदतीचा हात दिला जातो. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोण होईल मराठी करोडपतीच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यात आली. मात्र ही मदत काहीशा वेगळ्या अंदाजात करण्यात आली. रसिकांच्या लाडक्या कलाकारांसह कोण होईल करोडपतीमध्ये दिवाळी आणि खास भाऊबीजचे सेलिब्रेशन करण्यात आले. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिचा भाऊ संदेशसह कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर हजेरी लावली. सोनाली आणि संदेश पहिल्यांदाच या निमित्ताने एकत्र पाहायला मिळणार आहेत. दोघांनीही सेटवर भाऊबीजचे सेलिब्रेशन तर केले आहे शिवाय गरजूंना मदतही केली. कोण होईल मराठी करोडपतीमध्ये 'इच्छा माझी पुरी करा' हा नवा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या नव्या उपक्रमाअंतर्गतच सोनाली आणि संदेश कोण होईल मराठी करोडपतीचा खेळ खेळले. यावेळी या बहिण भावांनी इच्छा माझी पुरी करा या उपक्रमाअंतर्गत कर्णबधीर मुलांना मदतीचा हात दिला. पूजा आणि मिलिंद झवेरी यांना दोघांनी श्रवणयंत्राची मदत केली. या सामाजिक कार्यासह भाऊबीज साजरी करताना सोनाली कुलकर्णीनं बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. भावासोबत केलेली धम्माल मस्तीच्या आठवणी तिने रसिकांसमोर उलगडल्या. यावेळी सोनालीने आपल्या भावासह काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. तसेच पडद्यासमोर किंवा पडद्यामागे आपल्या भावाला मदत करायची आहे असेही सोनालीने यावेळी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राचा महामंच-कोण होईल मराठी करोडपतीचा हा भाऊबीज स्पेशल भाग नक्कीच खास ठरेल असे म्हटल्यास वावगे ठरु नये.