सोनाली कुलकर्णी म्हणतेय, 'होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 17:46 IST2024-07-31T17:46:11+5:302024-07-31T17:46:44+5:30
Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

सोनाली कुलकर्णी म्हणतेय, 'होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा'
सन मराठी वाहिनीने नुकतेच त्यांच्या नवीन टॉक शो ‘होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा’(Hou De Charcha Karyakram Aahe)ची घोषणा केली आहे.या शोचे अँकरपद प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सांभाळणार आहेत. शोमध्ये मनोरंजन, गॉसिप, आणि हृदयस्पर्शी संभाषणांची मेजवानी असेल, ज्यात मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय सेलिब्रिटी आणि प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वे सहभागी होतील. या शोमध्ये क्रांती रेडकर, समीर वानखेडे, अजिंक्य देव, अश्विनी भावे, यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांसह, अमृता फडणवीस, किरीट सोमैया यांसारख्या प्रभावशाली राजकीय पाहुण्यांचा समावेश असेल.
सेलिब्रिटी त्यांच्या बालपणातल्या आठवणी,भविष्यकालीन इच्छांबद्दल आणि काही गुपित अँकर सोनाली कुलकर्णीला सांगणार आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या तारकांच्या जीवनातील नवीन पैलूंची ओळख होईल. सोनाली कुलकर्णी शोबद्दल म्हणाली की,"मी ‘होऊ दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा’चा भाग होण्यास खूप उत्सुक आहे. मी आधी काही शोजचे परीक्षक म्हणून काम केले आहे, परंतु हे माझे पहिलेच अँकरपद आहे, आणि मी खरोखरच याबद्दल उत्साही आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांचा आयुष्याचा प्रवास मला कळला त्यांच्या आयुष्यातून खूप प्रेरणा मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्वाची भावनिक बाजू पाहायला मिळाली, त्यांच्याकडून बरच काही शिकता आलं. प्रेक्षकांना सुद्धा हाच अनुभव येणार याची मला खात्री आहे."
शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, वैवाहिक जीवन, आणि आताचे जीवन या विविध टप्प्यांवर आधारित खंडांद्वारे, प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या तारकांच्या जीवनाचे विविध पैलू पाहायला मिळतील. हा कार्यक्रम तुमच्या आवडत्या सेलेब्रिटीच्या व्यक्तिमत्वाचे कधीहि न पाहिलेले पैलू उलगडणार आहे. मसालेदार आणि चवदार संभाषणांनी भरलेला हा कार्यक्रम ४ ऑगस्टपासून दर रविवारी रात्री ९ वाजता सन मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.