"मी तर गरोदर असतानाही काम केलंय...", दीपिका पादुकोणच्या ८ तास वर्किंग शिफ्टवर स्पष्टच बोलल्या स्मृती इराणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 14:31 IST2025-10-15T14:31:38+5:302025-10-15T14:31:59+5:30
दीपिकाने ८ तास काम करण्याची अट ठेवल्याने तिला अनेक प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही दीपिकाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या. आता स्मृती इराणींनी दीपिकाच्या या वक्तव्यावर त्यांचं मत मांडलं आहे.

"मी तर गरोदर असतानाही काम केलंय...", दीपिका पादुकोणच्या ८ तास वर्किंग शिफ्टवर स्पष्टच बोलल्या स्मृती इराणी
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या ८ तास कामाच्या शिफ्टमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिकाने ८ तास काम करण्याची अट ठेवल्याने तिला अनेक प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही दीपिकाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी दीपिकाचं समर्थनही केलं होतं. आता स्मृती इराणींनी दीपिकाच्या या वक्तव्यावर त्यांचं मत मांडलं आहे.
स्मृती इराणींनी इंडिया टुडेशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. "निर्मात्यांच्या नियमांचं पालन केलं जाणार नाही, असं तुम्ही म्हणू शकत नाही. मला आज काम करायची इच्छा नाही, असं म्हणता येत नाही. हे व्यावसायिकदृष्टी स्वीकाहार्य नाही. पण, त्याचबरोबर मला हे पण वाटतं की एक इंडस्ट्री म्हणून मार्केट व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपण नवे मार्ग शोधू", असं स्मृती इराणी म्हणाल्या.
दीपिकाच्या ८ तास काम करण्याच्या मागणीवरही त्यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "हा वैयक्तिक प्रश्न आहे. पुरुष मूल जन्माला घालत नाहीत, असं जे म्हणतात. त्यांनी मुळात प्रेग्नंसीच्या मुद्द्यावर पुरुष आणि महिला अशी तुलना करू नये. कॉन्ट्रोव्हर्सी या तयार केल्या जातात. त्यातील काही तर चर्चा व्हावी म्हणूनच असतात. मी माझ्या दोन्ही प्रेग्नंसीच्या वेळेस माझ्या महिला निर्मातीसोबत काम करत होते. मला माझ्या निर्मातीला यशस्वी करायचं होतं. कारण एका तरुण निर्मातीला आयकॉनिक शो मिळाला होता. तिचा शो चालावा ही एक अभिनेत्री म्हणून माझी जबाबदारी होती".
"जर मी माझ्या कामात सातत्या दाखवलं नाही तर माझ्या निर्मात्यांना त्याचा मोठा तोटा सहन करावा लागेल. आणि हे योग्य नाही. मी कामावर गेले नाही. तर १२० लोकांना त्यांचा त्या दिवसाचा पगार मिळणार नाही. त्यामुळे हा १२० कुटुंबांवर अन्याय होईल. त्यामुळे माझा कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगळा आहे", असंही स्मृती इराणी म्हणाल्या.