'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर येणार प्रसिद्ध गायक सुदेश भोसले, रसिकांना मिळणार सुरांची पर्वणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 14:19 IST2022-01-03T13:44:08+5:302022-01-03T14:19:20+5:30
या आठवड्यात बॉलिवूड मध्ये गाजलेला बुलंद आवाज सुदेश भोसले (Sudesh Bhosale) इंडियन आयडल मराठीच्या मंचावर येणार आहेत.

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर येणार प्रसिद्ध गायक सुदेश भोसले, रसिकांना मिळणार सुरांची पर्वणी!
सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवर 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) या रिअॅलिटी शोला प्रेक्षक उत्स्फूर्त प्रतिसाद देतायत. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतं असून ती भाषा मराठी असल्याने रसिकांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेने केली आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहे.
या आठवड्यात बॉलिवूड मध्ये गाजलेला बुलंद आवाज सुदेश भोसले (Sudesh Bhosale) इंडियन आयडल मराठीच्या मंचावर येणार आहेत. एखाद्या कलाकाराच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्याच्या आपल्या कलेने सुदेशजीनी सगळ्यांची मने जिंकली. महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज म्हणून ते नावारूपाला आले. 'जुम्मा चुम्मा' 'शावा शावा' 'पी ले पी ले ओ मेरी जानी' यांसारखी अनेक सदाबहार गाणी त्यांनी गायली आहेत.
स्पर्धकांबरोबर सुदेशजींनी देखील मंचावर धमाल केली आणि अनेक आठवणींना उजाळा दिला. स्पर्धक अश्विनी मिठे हिच्याबरोबर एक डुएट गाणं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. सुदेशजींच्या मंचावर येण्याने माहोल एकदमच सुरेल झाला होता आणि स्पर्धकांनी आपल्या सादरीकरणाने सर्वच परीक्षकांना खूश केलं. सुदेश भोसले यांच्या येण्याने 'इंडियन आयडल मराठी' ह्या मंचाच्या माध्यमातून तमाम रसिकांना सुरांची पर्वणी मिळणार आहे.