आता आठवणी राहतील कायम जिवंत! शिव ठाकरेने आजीसाठी जे केलं ते पाहून डोळे भरून येतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:26 IST2025-12-26T15:25:23+5:302025-12-26T15:26:12+5:30
शिव ठाकरेनं ख्रिसमसला आजीसाठी केलं असं काही.., नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

आता आठवणी राहतील कायम जिवंत! शिव ठाकरेने आजीसाठी जे केलं ते पाहून डोळे भरून येतील
आजी म्हणजे काय तर दूधावरची साय... आजी ही आजीच असते. मग ती कोणा सर्वसामान्यांची असो किंवा कोणा सेलिब्रेटींची. आजीचा मायेचा एक हात मनाला शांत करण्यास पुरेसा असतो. सध्याच्या काळातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला शिव ठाकरेचंही आपल्या आजीवर प्रचंड प्रेम आहे. अभिनेता शिव ठाकरेने आपल्या लाडक्या आजीच्या आठवणींना चिरकाल टिकवून ठेवण्यासाठी एका अनोख्या कलेचा आधार घेतला आहे, ती कला म्हणजे '३डी कास्टिंग'. शिवने आपल्या आजीच्या हातांचे आणि पायांचे हुबेहूब ३डी ठसे बनवून घेतले आहेत.
'३डी कास्टिंग' ही कला प्रचंड लोकप्रिय होत आहे. शिव ठाकरे याने देखील याच कलेचा आधार घेत आपल्या लाडक्या आजीच्या आठवणींंना आता मूर्त रूप दिलंय. शिवने आपल्या आजीच्या हातांचे आणि पायांचे हुबेहूब ३डी ठसे बनवून घेतले आहेत. याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. "माझा सांता क्लॉज... माझी आजी" असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं. हा व्हिडीओ पाहून चाहते थक्क झाले आहेत, कारण यामध्ये त्याच्या आजीच्या हातावरील, पायांवरील त्या सुरकुत्या आणि रेषा देखील स्पष्टपणे दिसत आहेत. शिवच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्याचं प्रचंड कौतुक होत आहे.
शिव ठाकरे आपल्या कुटुंबाच्या आणि विशेषतः आपल्या आजीच्या किती जवळ आहे, हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. आजीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा आणि तिचे अस्तित्व सदैव आपल्यासोबत राहावे, या हेतूने हे ३डी कास्टिंग करून घेतले आहे. मुळचा अमरावतीचा असलेल्या शिव ठाकरेचा चाहतावर्ग हा फार मोठा आहे. 'मराठी बिग बॉस' जिंकल्यानंतर शिव ठाकरेने 'हिंदी बिग बॉस'चा सीझन १६ही गाजवला. या शोचा तो उपविजेता ठरला. आपल्या साधेपणामुळे कायम चाहत्यांचं लक्ष वेधणारा शिव ठाकरे टिव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे.