'नामकरण'च्या सेटवर रिमाताई हिला चिंटू नावाने हाक मारायच्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 13:13 IST2017-05-19T07:43:46+5:302017-05-19T13:13:46+5:30
काम करत करतच अखेरचा श्वास घ्यावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. त्यापैकी काही मोजके कलाकार असे असतात की ज्यांना ...

'नामकरण'च्या सेटवर रिमाताई हिला चिंटू नावाने हाक मारायच्या
क म करत करतच अखेरचा श्वास घ्यावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. त्यापैकी काही मोजके कलाकार असे असतात की ज्यांना असा मृत्यू येतो. असाच काहीसं अभिनेत्री रिमा यांच्याबाबतीत झालं. अखेरच्या श्वासापर्यंत त्या काम करत होत्या. मंगळवारी त्यांनी पूर्ण दिवस नामकरण मालिकेच्या सेटवर शुटिंगसाठी वेळ घालवला. मात्र त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की रिमा यांचा हा सेटवरील शेवटचा दिवस असेल. त्यामुळे नामकरण मालिकेच्या कलाकारांचा रिमाताई आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नव्हता. त्यातल्या त्यात या मालिकेमधील चिमुकली आणि सगळ्यांची फेव्हरेट अरशीन नामदार हिला तर रिमाताईंच्या अकाली निधनामुळे मोठा धक्काच बसला. या मालिकेत चिमुकली अरशीन रिमाताईंच्या नातीची भूमिका साकारत होती.रिमाताईंच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अवघी चित्रपटसृष्टी जमा झाली होती. यांत नामकरण मालिकेतील कलाकार आणि चिमुकल्या अरशीनचाही समावेश होता. रिमाताईंचं या मालिकेच्या सेटवरील प्रत्येकाशी खास नातं होतं. प्रत्येक कलाकाराशी त्या आपुलकीने आणि प्रेमाने वागायच्या. प्रत्येकाची आईप्रमाणे काळजी घ्यायच्या. सीन कुणाचाही असो आपल्या अनुभवाच्या जोरावर त्या प्रत्येकाला तो सीन अधिक चांगला कसा होईल याच्या टीप्स द्यायच्या. या मालिकेतील चिमुकल्या अरशीन हिच्याशी तर त्यांचं वेगळं नातं होतं. त्यांच्यासाठी ती जणू काही त्यांची नात होती. सेटवर रिमाताई अरशीनची काळजी घ्यायच्या. सेटवर धावू नको, पळू नको, पडशील, काही ना काही लागेल अशा प्रेमळ सूचना करायच्या.रिमाताई आणि अरशीन यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. रिमाताई तिला चिंटू नावानं हाक मारायच्या. त्यामुळे रिमाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी घरी पोहचल्यावर अरशीनला मोठा धक्काच बसला. त्यांच्या पार्थिवासमोर तिला रडू कोसळलं. रिमाताई आपल्याला घट्ट मिठी मारतील, कशी आहे अशी चौकशी करतील असं वाटलं होतं. मात्र त्या आपल्यात नाहीत ही कल्पना सहन होत नाही. आता माझी काळजी कोण घेणार, मी कुणाशी बोलणार असं बोलत असताना अरशीनला अश्रू अनावर झाले.