"अन् याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही", संकर्षणचे कविवेतून राजकीय बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 12:53 PM2024-04-25T12:53:21+5:302024-04-25T12:53:48+5:30

"नवा साहेब, घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का?", संकर्षण कऱ्हाडेची ही राजकीय कविता एकदा ऐकाच

sankarshan karhade poem on politicians and maharashtra politics watch video | "अन् याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही", संकर्षणचे कविवेतून राजकीय बाण

"अन् याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही", संकर्षणचे कविवेतून राजकीय बाण

संकर्षण कऱ्हाडे हा मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमधून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयाबरोबरच संकर्षण उत्तम लेखक आणि कवी आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर तो कवितेमधून व्यक्त होत असतो. नुकतंच त्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कवितेतून बाण सोडले आहेत. त्याची ही कविता संकर्षणने फेसबुकवरुन शेअर केली आहे. 

संकर्षणची कविता 

सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं, 
खात्यापित्या घरचं तरी दु:खी मला वाटलं...
माणुसकीच्या नात्याने माझंच मन भरुन आलं, 
मीच जवळ जाऊन म्हटलं "काय ओ काय झालं?"
तुमच्यापैकी कोणाला काही झालंय का? 
तिन्हीसांजेला असे बसलात कुणी गेलंय का? 

कुटुंबप्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा, 
डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते ढसाढसा
ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय...
आम्हा सगळ्या कुटुंबीयांचं एक एक मत वाया गेलंय

आता हा माझा नातू बघ नुसताच जीवाला घोर आहे...
सभेला जायचं, घोषणा द्यायच्या...याला फारच जोर आहे
बरं एवढं करून मत दिलं..तरी याचं भागलं नाही
याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही
मग ती सभा, ती गर्दी, तो आवाज, त्या घोषणा याचं पुढे काय झालं? 
आणि असं करत याचं मत ३-४ वेळा वााया गेलं...

आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाइफ
ना करिअर मे ग्रोथ है, ना जिंदगी मे वाइफ...
अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कोणी आणत नाही
भारतभर जाऊन तुझी पावलं दमली पण हात काही चालत नाही...
मग ते धोतर, ती काठी, तो चष्मा, ते आडनाव...त्याचं पुढे काय झालं? 
आणि असं करत यांचही मत बरेच वर्ष वाया गेलं

आता या माझ्या मुलाला बरंका राजकारणातलं फार कळतं
याचं मन गेली अनेक वर्ष घडाळ्यातली वेळ पाळतं, 
चुकली वेळ झाला खेळ वेगळंच संधान साधलं...
एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबाने स्वत:च्या हातावर बांधलं
मग नवा साहेब, घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का? 
का जुन्या साहेबासोबत राहून तुतारीतून आवाज काढू का? 
मग ते वय, तो अनुभव, ती निष्ठा, तो परिवार त्याचं पुढे काय झालं?
असं करत या माझ्या मुलाचं मत मात्र वाया गेलं

आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची
जरा कुणी नडलं की घरातला बाण काढायची, 
मी तिला कितीदा म्हटलं सूनबाई बाण जपून वापरायचा असतो गं...
एकदा हातातून सुटला की परत येत नसतो गं...
मग जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली
अहो, जिथे शब्दातून आग लागायची तिथे हातात मशाल आली...
मग तो बाण, तो बाणा, ते कडवट, ते सैनिक यांच्यात असं काय झालं? 
पण, असं करत या माझ्या सूनेचं मत मात्र वाया गेलं...

आता ही माझी बायको बरं का, ही घडवेल तेच घरात घडतं
नाव हीच लक्ष्मी पण हिला कमळ फार आवडतं...
मी लगेच पुढे विचारलं माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल
कमळ तर जिथल्या तिथे मग यांचं मत वाया गेलं नसेल
आजोबा म्हणाले ती दु:खात नाही तशी पण तिच्या मनात तळमळ आहे
कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं, त्यांच्याच हातात आता कमळ आहे
मग ते विरोधक, हे सत्ताधारी, हे प्रामाणिक, ते बाजारी...यांच्यात असं काय झालं? 
पण, असं करत या माझ्या बायकोचं आता वाटतंय मत वाया गेलं
त्यामुळे पुढाऱ्यांनो तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात हाच माझा पक्ष आहे
तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे
त्यामुळे इथून पुढे तरी दिलेल्या मताची किंमत जरा तरी ठेवा
आणि मतदारांनो मतदान करा आणि लोकशाही जिवंत ठेवा

या कवितेचा व्हिडिओ शेअर करत संकर्षण म्हणतो, "सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर काही लिहिण्याचा मनापासून प्रयत्न केला आणि प्रेक्षकांनी काल तो प्रयत्न अगदी मनापासून स्विकारला...तुम्हीही ऐका , पहा आणि मनापासून सांगा की तुमच्याही मनांत हेच आहे का ..?". संकर्षणची ही कविता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्याच्या कवितेला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत दाद दिली आहे. 

Web Title: sankarshan karhade poem on politicians and maharashtra politics watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.