'इंडियाज गॉट लेटंट'चा सिझन २ येणार? समय रैनाच्या घोषणेने चाहत्यांचा आनंद गगनात मावेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:01 IST2025-11-10T16:57:59+5:302025-11-10T17:01:10+5:30
समय रैनाच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.

'इंडियाज गॉट लेटंट'चा सिझन २ येणार? समय रैनाच्या घोषणेने चाहत्यांचा आनंद गगनात मावेना
स्टँड-अप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. "इंडियाज गॉट लेटेंट" शोमध्ये रणवीर अलाहबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समय वादात सापडला होता. त्याला लोकांच्या नाराजीचा सामना तर करावा लागलाच, पण यासोबतच कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावं लागलं होतं. सर्व स्तरावरुन झालेल्या टीकेनंतर त्यानं शोचे सर्व एपिसोड्स YouTube वरून काढून टाकले होते. 'इंडिया गॉट लेटेंट'बंद झाल्यानंतर समयच्या काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ते त्याला सतत 'इंडिया गॉट लेटेंट'चा पुढचा भाग कधी येणार, याबद्दल विचारताना दिसले. अशातच आता समय रैना याच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.
समय रैना सध्या त्याच्या 'स्टील अलाईव्ह अँड अनफिल्टर्ड' (Still Alive & Unfiltered) या टूरवर आहे. शनिवारी, ८ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या शोदरम्यान, समयने प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी समयने आपल्या वादग्रस्त शोबद्दल बोलत असताना आत्मविश्वासाने म्हटलं, "शो तर मी परत आणणार". हे ऐकताच मैदानावर उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्या वाजवून उत्साह व्यक्त केला. समयनं शो परत आणण्याची हिंट दिल्यानं चाहते खुश झाले आहेत.
'इंडियाज गॉट लेटेंट' वाद काय होता?
'इंडियाज गॉट लेटेंट' या शोवर कॉमेडियन समय रैना आणि इतर काही कॉन्टेंट क्रिएटर्सवर अश्लीलता पसरवल्याचे गंभीर आरोप झाले होते. रणवीर अलाहाबादियानं पालकांच्या वैयक्तिक नात्याबद्दल अश्लील भाषेत एक प्रश्न विचारला होता. या प्रकरणात यूट्यूबर्स अपूर्वा मुखीजा, आशीष चंचलानी, रणवीर अलाहाबादिया यांच्यासह अनेक लोकप्रिय डिजिटल कलाकारांचा सहभाग होता. हा वाद एवढा वाढला की खुद्द समयला गुवाहाटी क्राइम ब्रँचसमोर हजर व्हावं लागलं होतं. या वादामुळे एकीकडे डिजिटल माध्यमांवरील कटेंटवर एक मत तयार झालं होत, तर दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतही नव्याने चर्चा सुरू झाली होती.
समयची कमाई किती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, समय रैना दरमहा सुमारे १.५ कोटी रुपये कमवतो. त्याची कमाई प्रामुख्याने त्याच्या YouTube चॅनेलवर आधारित आहे, ज्यामध्ये जाहिराती आणि सबस्क्राइबर्सचा समावेश आहे. ब्रँड प्रमोशनल कंटेंट आणि ब्रँड एंडोर्समेंट हे देखील समयच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे १४० कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे.