Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य! 'बिग बॉस मराठी ५'चा नवा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 19:14 IST2024-08-22T19:11:43+5:302024-08-22T19:14:15+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'ने संपूर्ण आठवडा गाजवला आहे. खरंतर 'बिग बॉस मराठी'ने स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य! 'बिग बॉस मराठी ५'चा नवा विक्रम
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन ( Bigg Boss Marathi Season 5) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. नव्या सदस्यांसोबत यंदा शोला सूत्रसंचालकही नवीन मिळाला. सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा शो होस्ट करतो आहे. तो सूत्रसंचालन करतोय, हे समजल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. त्याचा चांगला परिणामदेखील पाहायला मिळतो आहे. पाचव्या सीझनला पहिल्या दिवसांपासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. रितेशच्या 'भाऊच्या धक्क्या'ने पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला आहे. नव्या सीझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, कल्ला या सर्वच गोष्टी सीझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरत आहेत. लहान मुलं, महिलावर्ग ते आबाल वृद्ध अशा सर्वांनाच 'बिग बॉस मराठी'ने वेड लावले आहे. रितेशच्या 'भाऊच्या धक्क्या'ने पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड्स तोडून नवा विक्रम केला आहे. शनिवारच्या भाऊच्या धक्क्याला ३.७ रेटिंग मिळाले असून रविवारच्या अक्षय कुमार स्पेशल भाऊच्या धक्क्याला ४.० रेटिंग मिळाले आहे. एकंदरीतच 'भाऊच्या धक्क्याला' ३.९ एव्हरेज रेटिंग मिळाले आहे.
'बिग बॉस मराठी'ने संपूर्ण आठवडा गाजवला आहे. खरंतर 'बिग बॉस मराठी'ने स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. इतर मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांना मागे टाकत 'बिग बॉस मराठी'ने इतिहास रचला आहे.