सायंकित कामत झळकणार तुझं माझं ब्रेक अप या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 14:34 IST2017-09-15T09:04:06+5:302017-09-15T14:34:06+5:30

रात्रीस खेळ चाले या मालिकेत सायंकित कामतने अभिरामची व्यक्तिरेखा साकारली होती. आता तो तुझं माझं ब्रेक अप या मालिकेत झळकणार आहे. ...

The psychiatrist will be seen in my break-up series | सायंकित कामत झळकणार तुझं माझं ब्रेक अप या मालिकेत

सायंकित कामत झळकणार तुझं माझं ब्रेक अप या मालिकेत

त्रीस खेळ चाले या मालिकेत सायंकित कामतने अभिरामची व्यक्तिरेखा साकारली होती. आता तो तुझं माझं ब्रेक अप या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना एक आगळी वेगळी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. प्रेमविवाहाच्या गाठी या प्रेमानेच बांधल्या जातात पण काही काळ लोटला की यातील केवळ विवाह एवढाच शब्द उरतो आणि प्रेमाचा गोडवा हळूहळू ओसरू लागतो. लग्नाआधी एकमेकांशी कायम प्रेमाने वागण्याच्या, कायम सोबत देण्याच्या, कधीही न भांडण्याच्या आणाभाका हवेत विरून जातात आणि कोणत्या गोष्टीवरून भांड्याला भांडं लागतं याचा पत्ताही लागत नाही. थोडक्यात काय प्रेमविवाह झालेल्यांच्या घरोघरी या समस्याच्या चुली पेटलेल्या दिसतातच आणि त्यातून वादाचा धूरही निघताना आपण कायम बघतो. प्रेमावर वाद कुरघोडी करतात आणि तेच नात्याच्या आड येतात. अर्थात हे वाद अतिशय छोट्या छोट्या गोष्टींवरून असतात पण राईचा पर्वत कधी होतो ते दोघांनाही कळत नाही. अशाच काही हलक्या फुलक्या वादांची आणि प्रेमाच्या नात्याची गोष्ट प्रेक्षकांना झी मराठीच्या आगामी तुझं माझं ब्रेक अप या मालिकेमधून बघायला मिळणार आहे. 
तुझं माझं ब्रेक अप या मालिकेत प्रेक्षकांना समीर आणि मीराची कथा पाहायला मिळणार आहे. एकाच महाविद्यालयात शिकणारे हे दोघे जण. वर्गातील बाकावरून बागेतील बाकावर यांचे प्रेम कधी पोहचले हे त्यांनाही कळाले नाही. समीर हा देसाई कुटुंबाचा एकुलता एक लाडका सुपुत्र. विशेषतः आईचा लाडका. घराची श्रीमंती असल्याने हवं ते हवं तेव्हा त्याला हातात मिळतं. त्यामुळे वेगळ्या कष्टाची आणि शिस्तीची त्याला कधीच सवय लागली नाही. तर दुसरीकडे मीरा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शिस्तबद्ध मुलगी. स्वतःचे काम स्वतः करणारी आणि कुणी काम करताना पसारा केला की त्याला धारेवर धरणारी. असे हे भिन्न स्वभावाचे दोन जीव एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यात आकंठ बुडतातही. असे म्हणतात की, प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात तसेच काहीसे यांच्या बाबतीतही होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रेम आणि आनंदात पार पडतात पण त्याचा गोडवा ओसरला की मग सुरू होते संसाराची तारेवरची कसरत. लग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा न ठेवता एकमेकांच्या चुका काढायला लागतात आणि भांडायलाही लागतात. लग्नाआधी एकमेकांचा दुरावा एक क्षणही सहन न करणारे आता एकमेकांनाच सहन करतायत की काय असे चित्र निर्माण होते आणि बघता बघता हे भांडण एवढ्या टोकावर जाते की, ते दोघे वेगळे होण्याचाही निर्णय घेतात. लग्नानंतर वर्षभरातच वेगळे झाल्यानंतर त्यांना एकमेकांची उणीव भासायला लागते आणि प्रेमाची जाणीवही व्हायला लागते. मग ते दोघे पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतात. पण हा निर्णय त्यांच्या घरच्यांना मान्य होईल का? पुन्हा एकत्र येताना आधी केलेल्या चुकांना टाळण्यासाठी दोघांना काय कसरत करावी लागेल? आणि प्रेमाचा गोडवा हरवलेला हा संसार पुन्हा गोडी गुलाबीचा संसार बनेल का? याचीच गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. घाईने प्रेमात पडणाऱ्या आणि घाईने लग्नाच्या गाठी जोडणाऱ्या जोडप्यांच्या सुखी संसाराची स्वप्नं अपेक्षांच्या कसोटीवर खरी उतरतात का? याची ही मजेदार गोष्ट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
‘तुझं माझं ब्रेक अप’ या मालिकेत समीरची भूमिका सायंकित कामत हा अभिनेता साकारत आहे तर मीराच्या भूमिकेत केतकी चितळे ही अभिनेत्री आहे. याशिवाय मालिकेत रोहिणी हट्टंगडी, उदय टिकेकर, विजय निकम, राधिका हर्षे, संयोगिता भावे, रेश्मा रामचंद्र, उमेश जगताप, मधुगंधा कुलकर्णी आदी अनुभवी कलाकारांची फौजही बघायला मिळणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे आहे. या मालिकेची कथा शेखर ढवळीकर यांची असून पटकथा चिन्मय मांडलेकरची आहे तर संवाद मुग्धा गोडबोलेचे आहेत.

Also Read : रात्रीस खेळ चाले मालिका येणार कन्नडमध्ये

Web Title: The psychiatrist will be seen in my break-up series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.