स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेत्रीचं सेटवर पार पडलं केळवण, होणार आदेश बांदेकरांची सून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:36 IST2025-11-26T12:35:36+5:302025-11-26T12:36:24+5:30
अभिनेते आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचं सेटवर केळवण पार पडलं.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेत्रीचं सेटवर पार पडलं केळवण, होणार आदेश बांदेकरांची सून
Pooja Birari Tie Knot With Soham Bandekar: मराठी कलाविश्वात सध्या अनेक कलाकारांच्या लग्नांची आणि साखरपुड्यांची धामधूम सुरू आहे. नुकतंच अभिनेता मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांनी लग्नगाठ बांधली. तसेच येत्या २९ नोव्हेंबर 'बिग बॉस मराठी'चा विजेता सूरज चव्हाणदेखील बोहल्यावर चढणार आहे. तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड २ डिसेंबर २०२५ रोजी लग्न करणार आहे. तर काल अभिनेत्री कोमल कुंभार ही गोकुळ दशवंतसोबत लग्नबेडीत अडकली. यानंतर आता स्टार प्रवाहच्या लोकप्रिय अभिनेत्रीच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. ती अभिनेत्री आहे पूजा बिरारी. 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेमध्ये मंजिरी ही भूमिका साकारणारी पूजा बिरारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. विशेष म्हणजे ती महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरची सून होणार आहे. नुकतंच पूजा बिरारीचं तिच्या सहकलाकारांनी सेटवर थाटामाटात केळवण साजरं केलं.
पूजा आणि आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम हे लवकरच विवाह बंधनात अडकतील. काही दिवसांपूर्वीच ही बातमी समोर आलेली. पूजा आणि सोहम यांच्या घरी लगीनघाई सुरु झाल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सोहम बांदेकर याचे त्याच्या लाडक्या मावश्यांनी म्हणजेच अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या जवळच्या मैत्रिणींनी केळवण घातले होते. आता पूजा बिरारी हिचे सुद्धा येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर केळवण पार पडले आहे.
लग्नापूर्वीचे हे केळवण एखाद्या सणासारखेच उत्साहात साजरे करण्यात आले. सध्या सोशल मीडियावर या केळवणाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पूजा बिरारीचा कॉस्ट्यूम डिझायनर तन्मय झंगम याने हे फोटो शेअर करताना "आमच्या लाडक्या पूजाचं केळवण" असे प्रेमळ कॅप्शन लिहिलं. याशिवाय अभिनेता विशाल निकम आणि मालिकेतील इतर कलाकारांनीही या खास सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

पूजा मूळची पुण्याची आहे. ती पहिल्यांदा 'साजणा' या मराठी मालिकेत दिसली होती. झी युवा वाहिनीवर ही मालिका प्रसारित झाली होती. यानंतर ती 'स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा' या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचली. यात तिची पल्लवी ही भूमिका होती. ज्यात ती अभिनेता अक्षर कोठारीसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. तर आता 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत पूजा मंजिरी ही भूमिका साकारत आहे. तर 'लक्ष्य' मालिकेतून अभिनेता म्हणून पदार्पण करणारा सोहम बांदेकर सध्या मालिका विश्वात निर्माता म्हणून सक्रिय आहे. बांदेकर प्रोडक्शन्सचं काम तो बघत आहे. सोहम सध्या 'ठरलं तर मग' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकांच्या निर्मितीचे काम पाहतो आहे.