‘डीआयडी लिटिल मास्टर्स’मध्ये झाला प्रभुदेवाचा 45 वा वाढदिवस साजरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 14:27 IST2018-04-04T08:57:01+5:302018-04-04T14:27:01+5:30

नृत्याचा बादशहा प्रभुदेवाच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी, 7 एप्रिल रोजी रात्री 9.00 वाजता ‘झी टीव्ही’वरील ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ ...

Pardhdev's 45th Birthday Celebrated in 'DID Little Masters' | ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’मध्ये झाला प्रभुदेवाचा 45 वा वाढदिवस साजरा!

‘डीआयडी लिटिल मास्टर्स’मध्ये झाला प्रभुदेवाचा 45 वा वाढदिवस साजरा!

त्याचा बादशहा प्रभुदेवाच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी, 7 एप्रिल रोजी रात्री 9.00 वाजता ‘झी टीव्ही’वरील ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ कार्यक्रमातील स्पर्धक ब्लॉकबस्टर्स बच्चे त्याच्यासाठी लाल गालिचा अंथरणार आहेत. आपल्या ‘मर्क्युरी’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी या कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या प्रभुदेवावर आपला प्रभाव टाकण्यासाठी सर्व स्पर्धक बच्चे उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर करतील. आपल्या लवचिक आणि अफलातून पदन्यासामुळे भारतातील नृत्याचा दैवत म्हणून ओळखला जाणारा प्रभुदेवा या मुलांचे नृत्यकौशल्य पाहून चकित झालाच, पण त्यांनी त्याच्या 45 वा वाढदिवस या कार्यक्रमाच्या सेटवर साजरा करताच प्रभुदेवाला आनंदाश्चर्याचा सुखद धक्काही बसला!

नृत्याच्या क्षेत्रात असलेले प्रभुदेवाचे दैवतासमान स्थान लक्षात घेऊन या ब्लॉकबस्टर बच्चेकंपनीने त्याला आगळी आदरांजली वाहण्याची योजना आखली होती. आपल्या स्किपर्सच्या मदतीने स्पर्धक मुलांनी प्रभुदेवाच्या लोकप्रिय हिंदी गाण्यांवर नृत्ये सादर केली. त्यात प्रभुदेवाच्या मुकाबला, साडी के फॉल से आणि गंदी बात या लोकप्रिय गाण्यांचा समावेश होता. या नृत्यांनी केवळ प्रभुदेवाच प्रभावित झाला असे नव्हे, तर चित्रांगदा सिंह, सिध्दार्थ आनंद आणि मार्झी पेस्तनजी हे परीक्षकही त्यामुळे भारावून गेले होते.
पण इतक्याने सारे संपले नाही; कारण या नृत्यनिपुण स्पर्धकांचा प्रभुदेवा निरोप घेऊ लागताच त्याला आनंदाश्चर्याचा आणखी एक धक्का बसला. परीक्षक, स्पर्धकांनी प्रभुदेवाच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त सेटवर एक भला मोठा केक आणला. या सर्वांचे आपल्यावरील प्रेम पाहून प्रभुदेवा इतका चकित झाला की त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. आजवर आपला जन्मदिन इतक्या प्रेमाने कोणी साजरा केला नव्हता आणि आपण आजचा कार्यक्रम जन्मभर लक्षात ठेवू, असे त्याने भरलेल्या डोळ्यांनी सांगितले.

प्रभुदेवाला वाहिलेल्या आदरांजलीशिवाय या ब्लॉकबस्टर बच्च्यांनी काही अप्रतिम नृत्ये सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते. बृंदा दलाल या मुलीने सलाम-ए- इश्क या गाण्यावर आपल्या लयबध्द पदन्यासाने बहारदार नृत्य सादर केले, तर सूर्या श्रीजितने आपल्या प्यारी सखी या गाण्यावरील जोशपूर्ण नृत्याविष्काराने परीक्षकांबरोबरच प्रभुदेवाचीही दाद मिळविली. अल्ला दुहाई है या गाण्यावर स्पर्धेत वयाने सर्वात लहान असलेल्या स्टेसीने सर्वांची मने जिंकली, तर मन आणि मीत या जोडीने सादर केलेले हमसफर गाण्यावरील नृत्य पाहिल्यावर सर्वांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.

Web Title: Pardhdev's 45th Birthday Celebrated in 'DID Little Masters'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.