पराग त्यागीने पूर्ण केली पत्नी शेफाली जरीवालाची शेवटची इच्छा, लवकरच उघड करणार 'त्या' रात्रीचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:51 IST2025-08-14T13:50:54+5:302025-08-14T13:51:18+5:30
पराग त्यागीने सोशल मीडियावर भावुक व्हिडीओ शेअर केला आहे.

पराग त्यागीने पूर्ण केली पत्नी शेफाली जरीवालाची शेवटची इच्छा, लवकरच उघड करणार 'त्या' रात्रीचं सत्य
Parag Tyagi Fulfils Late Wife Shefali Jariwala’s Dream: अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला. २७ जून रोजी शेफाली जरीवाला हिचे अकाली निधन झाले होते. वयाच्या ४२ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. शेफालीच्या निधनानंतर तिचा नवरा दुःखात बुडाला होता. तेव्हापासून अभिनेता पराग त्यागी दररोज तिची आठवण काढतो. तो शेफालीशी संबंधित प्रत्येक गोष्टीबद्दल अपडेट्स देत असतो. १२ ऑगस्टला शेफाली जरीवाला आणि पराग त्यागी यांच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस होता. या खास दिवसानिमित्त त्याने सोशल मीडियावर शेफालीची शेवटची इच्छा पुर्ण करणार असल्याचं सांगितलंय.
पराग त्यागीने सोशल मीडियावर भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो म्हणतो, "२७ जूनला जी घटना घडली, ती तुम्हा सर्वांना माहितच आहे. परीची १५ वर्षांपासून एक इच्छा होती. तिला मुलींच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक फाउंडेशन किंवा एनजीओ उघडायचं होतं. १२ ऑगस्टला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त मी एक फाउंडेशनची नोंदणी केली आहे".
पुढे तो म्हणतो, "शेफाली जरीवावाला फाउंडेशन फॉर गर्ल एज्युकेशन एंड वुमन एंपॉवरमेंट. त्यासाठी शेफाली पराग त्यागीच्या नावे मी युट्यूबवर एक चॅनल सुरू केलं आहे. तुम्ही 'परी और सिंबा के पापा' या चॅनलला सबस्क्राइब करा. त्यावर मी लवकरच पॉडकास्ट घेऊन येतोय. खूप सारे प्रश्न अनुत्तरीत होते, खूप आरोप झाले, त्या रात्री नक्की काय झालं हे सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं. या सगळ्या गोष्टी मी माझ्या पॉडकास्टवर उघड करणार आहे. त्या पॉडकास्टवर जो काही रेव्हिन्यू मिळेल, तो मुलींच्या शिक्षणासाठी फाउंडेशनमार्फत खर्च करण्यात येईल. त्यामुळे तुम्ही जेवढं प्रेम आम्हाला दिलात तेवढंच प्रेम आमच्या युट्यूबला सुद्धा द्या अशी विनंती", असं तो म्हणाला.
शेफाली जरीवालाने आपला अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. २००२ मध्ये तिचे 'कांटा लगा' गाणे प्रसिद्ध झाले होते. या गाण्यातील तिच्या डान्सने, तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. याशिवाय, तिने अनेक टीव्ही सीसियल्स आणि अनेक प्रोजेक्ट्समध्येही काम केले होते. यासाठीही तिचे बरेच कौतुक झाले. पण, इतक्या कमी वयात शेफालीचा आकस्मिक मृत्यू होणं हे सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं. शेफालीच्या मृत्यूच्या कारणांबाबत वेगवेगळी सुरू असल्याचं बघायला मिळालं. शेफालीचा जीव ती घेत असलेल्या अॅंटी-एजिंग ट्रिटमेंटमुळेही गेला असल्याचं बोललं गेलं.