नवरात्रीनिमित्त अभिनेत्याची अनिता दातेसाठी खास पोस्ट; म्हणाला "माझ्या आयुष्यातील नवदुर्गा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:06 IST2025-09-30T18:06:11+5:302025-09-30T18:06:34+5:30
नवरात्रीनिमित्त अभिनेत्यानं अनिता दातेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

नवरात्रीनिमित्त अभिनेत्याची अनिता दातेसाठी खास पोस्ट; म्हणाला "माझ्या आयुष्यातील नवदुर्गा..."
Navratri 2025 : नवरात्री हा भक्ती, उत्साह आणि आनंदाचा सण. या नऊ दिवसांत देवीची आराधना करून तिच्या आशीर्वादाची याचना केली जाते. नवरात्र उत्सव हा देवी दुर्गाच्या नऊ रूपांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. या नवरात्रीनिमित्त अनेक जण त्यांच्या आयुष्यातील नवदुर्गांचं महत्त्व सांगत आहेत. अभिनेता सुमंत ठाकरेही त्याच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या महिलांबद्दल व्यक्त झाला. यावेळी त्यानं अभिनेत्री अनिता दातेसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
सुमंत ठाकरे याने अनिता दातेसाठी एक अतिशय भावनिक आणि प्रशंसा करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सुमंतने अनिताचे कौतुक करताना म्हटले की, "माझं असं पक्क मत आहे की जर अनिता १९व्या शतकात जन्माला आली असती तर एक महत्वाची आणि जग बदलून टाकणारी क्रांती तिने केली असती. तिच्यासारखी कधीही न बुजणारी, खंबीर, प्रेमळ, अभ्यासू, सुजाण, हुशार आणि सुंदर मुलगी मी क्वचितच बघितली असेन. अनिता काहीही करू शकते, उद्या जर मी तिला म्हंटल की कोडिंग कर आणि माझ्या कामात मदत कर तर ती ते ही सहज करेल. अभिनय क्षेत्रात फार कमी लोक अभिनयाचं शास्त्रीय आणि तांत्रिक शिक्षण घेऊन येतात. अनिता त्यातली आहे आणि तिची अभिनयाची ताकद आपण वारंवार बघतो. ह्याचं मुख्य कारण मला, ज्या पद्धतीने ती गोष्टींना भिडते हे वाटतं".
सुमंत आणि अनिताची मैत्री ओंकार या मित्राच्या माध्यमातून झाली होती. तो लिहितो, "जिवलग ओंकार मुळे अनिता आणि माझी मैत्री झाली आणि मैत्री झाल्यापासून अनिताने मला कायम एक वेगळा दृष्टिकोन दिलाय. गोष्टी समजून घेण्याची आणि त्यात वेगळं काहीतरी बघण्याचा तिचा गुण मला थोडा जरी आत्मसात करता आला तर आयुष्य बऱ्यापैकी मार्गी लागेल. नात्यांची, माणसांची, पुस्तकांची, सिनेमांची, नाटकाची आणि एकूणच जगाची इतकी समज असलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे, ती आपल्यावर माया करते हे किती सुखावणारं आहे".
अनिताबद्दल बोलताना सुमंत म्हणाला, "मनात होणारी चलबिचल, प्रश्न, काळोखात धकलणारे विचार हे मी अनिताजवळ बोलत असतो आणि ती ते अतिशय शांतपणे ऐकून घेते. त्यावर तिच्याकडे बोलायला असं काही तरी असतं ज्यामुळे ती चलबिचल, प्रश्न, विचार थांबतात. अनिता गोष्टींच्या आरपार बघते, जेव्हा जेव्हा तिचे निरक्षण ती मला सांगते, तेव्हा असं वाटतं की हे कसं काय जमतं हिला, कुठून आणते ही हे सगळं. कुठलंच काचकूच न ठेवता संवाद साधू शकणारी ही मैत्रीण माझ्या आयुष्यात आहे आणि ती कायम असणार आहे, ह्या विचाराने मी भरून पावतो", असे सुमंतने सांगितले.