'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांची खास उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 14:01 IST2021-11-22T14:00:50+5:302021-11-22T14:01:32+5:30
सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीने महाअंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढणार आहे.

'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांची खास उपस्थिती
प्रत्येक प्रतिभावान कलाकाराला त्याच्या कलेसाठी हवं असतं एक हक्काचं व्यासपीठ. ज्याद्वारे तो त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. डान्सचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांसाठी असाच एक मंच सज्ज झाला. स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सुरू झाला एक प्रवास तो म्हणजे मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा. या कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता आहे. ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर पाहायला मिळाले.मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम रसिकांसाठी मनोरंजनाची नवी पर्वणी ठरला. या शोच्या निमित्ताने पंधरा वर्षांनंतर अंकुश चौधरी पुन्हा एकदा टीव्हीवर परतला. सुपरजजच्या भूमिकेत अंकुश झळकला तर संस्कृती बालगुडेने सूत्रसंचालन करत रसिकांचे भरघोस मनोरंजनक केलेे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ६० स्पर्धकांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्यातील ४ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी. अप्रतिम नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या २८ नोव्हेंबरला रंगणार आहे. लायन्स ग्रुप, विजय - चेतन, नेहुल – समीक्षा आणि मायनस थ्री या चार जणांमध्ये महाअंतिम लढत रंगेल. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे.
विशेष म्हणजे सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीने महाअंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढणार आहे. सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांनी खास गाण्यावर परफॉर्म करत या सोहळ्याची शान वाढवली आहे. तेजश्री प्रधान आणि वैभव तत्ववादी यांचा सुद्धा रोमॅण्टिक अंदाज या सोहळ्यात पाहायला मिळेल. यासोबतच आई कुठे काय करते आणि स्वाभिमान मालिकेतील कलाकरही या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.