'आभाळमाया'ला अशी मिळाली चिंगी; स्वरांगी मराठेने सांगितला ऑडिशनचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 03:04 PM2023-06-02T15:04:26+5:302023-06-02T15:05:38+5:30

Swarangi marathe: 'आभाळमाया' या मालिकेत स्वरांगी मराठे हिने चिंगी ही बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं.

marathi tv serial abhalmaya swarangi marathe share her experience | 'आभाळमाया'ला अशी मिळाली चिंगी; स्वरांगी मराठेने सांगितला ऑडिशनचा किस्सा

'आभाळमाया'ला अशी मिळाली चिंगी; स्वरांगी मराठेने सांगितला ऑडिशनचा किस्सा

googlenewsNext

90 च्या काळात छोट्या पडद्यावर अनेक दर्जेदार मालिकांची निर्मिती झाली. या मालिकांच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर असं काही राज्य केलं होतं की मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपल्या जवळचा झाला होता. त्यातलीच एक मालिका म्हणजे आभाळमाया. या मालिकेने तर त्या काळातील प्रत्येक प्रेक्षकाला वेड लावलं होतं. ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजली. इतकंच कशाला आजही ही मालिका पुन्हा प्रदर्शित व्हावी यासाठी चाहते वरचेवर मागणी करताना दिसतात. यात बऱ्याचदा या मालिकेतील कलाकारांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते. त्यातलीच एक अभिनेत्री, गायिका म्हणजे स्वरांगी मराठी (swarangi marathe ). 

'आभाळमाया' या मालिकेत स्वरांगी मराठे हिने चिंगी ही बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. अलिकडेच स्वरांगीने आभाळमायामध्ये तिची एन्ट्री कशी झाली. तिला ही भूमिका कशी मिळाली हे सांगितलं. "त्याकाळी रोज रात्री अल्फा टीव्हीवर देवकी पंडित यांच्या आवाजातलं जडतो तो जीव.. हे गाणं सुरु झालं की तमाम लोक त्यांच्या हातचं काम सोडून आभाळमाया पाहायला बसायचे. प्रेक्षकांमध्ये या मालिकेची खूप क्रेझ होती. यामागे एक कारणही होतं. कारण, ती त्या काळातली पहिली डेली सोप होती", असं स्वरांगी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझ्या घरी पहिला फोन आला होत माझं एका मालिकेतील काम पाहून. तुम्ही तुमच्या मुलीला भेटायला घेऊन याल का? असं विचारलं. त्यावेळी मी ६-७ वर्षांची असेन.आई-बाबांचा हात धरुन मी गेले. त्यावेळी विनय आपटे समोर बसले होते. ते खूप मोठे कलाकार आहेत हे त्यावेळी मला माहित नव्हतं. तेव्हा काही भागांसाठी चिंगीचं पात्र होतं. आभाळमायासारख्या मालिकेला नाही म्हणण्याचं कारणचं नव्हतं. आई-बाबांनी करशील ना गं? विचारलं. मला कॅमेरा म्हणजे काय, आणि आईने पाठ करुन घेतलेली वाक्य बोलायची असतात हे माहित होतं."

"शुटिंग सुरु झालं मी आईसोबत रोज जायचे. तिथे आई पाठांतर करुन घ्यायची आणि मी ते बोलायचे. मालिकेच्या सेटवर माझ्याशिवाय कोणीच लहान नव्हतं. त्यामुळे सगळ्यांकडून माझे खूप लाड झाले. महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्यांनी सांभाळून घेतलं." दरम्यान, आभाळमाया ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजली. या मालिकेत विनय आपटे, मंदार देवस्थळी यांच्यासारखे दिग्दर्शक आणि सुकन्या मोने ,मनोज जोशी, संजय मोने, शुभांगी जोशी, अशोक समेळ, अंकुश चौधरी असे अनेक दिग्गज कलाकार होते.
 

Web Title: marathi tv serial abhalmaya swarangi marathe share her experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.