"'जुळली गाठ गं' मालिकेच्या माध्यमातून खेडेगावातील स्त्रियांचं जीवन बदलेल"- संकेत निकम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 14:32 IST2024-12-28T14:29:54+5:302024-12-28T14:32:50+5:30
'सन मराठी' वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

"'जुळली गाठ गं' मालिकेच्या माध्यमातून खेडेगावातील स्त्रियांचं जीवन बदलेल"- संकेत निकम
Sanket Nikam: 'सन मराठी' वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशातच 'सन मराठी'वर 'जुळली गाठ गं' ही नवी मालिका येत्या १३ जानेवारीपासून सोमवार ते रविवार दररोज रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर 'जुळली गाठ गं' मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या नव्या प्रोमोमध्ये अभिनेत्री पायल मेमाणेसह अभिनेता संकेत निकम धैर्य ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रोमोमध्ये धैर्य बिझनेस मॅन, आपल्या कामाला अधिक महत्त्व देणारा, सहजासहजी स्त्रियांची मदत न घेणारा दिसत आहे. पण त्याच्या आयुष्यात तो सावीला सामावून घेईल का? स्त्रियांविषयी असलेलं त्याच मत सावी बदलू शकेल? हे पाहणं रंजक ठरणार आहे. मालिकेचं कथानक वेगळं असल्यामुळे प्रेक्षकांना मालिका पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
मालिकेत धैर्य ही भूमिका साकारणारा अभिनेता संकेत निकम म्हणाला की,"'सन मराठी' वाहिनीवर काम करतोय या गोष्टीचा प्रचंड आनंद होत आहे. नातेवाईक, मित्रमंडळी सगळ्यांनी नव्या प्रोमोचं कौतुक केलं. 'जुळली गाठ गं' या मालिकेचा विषय खूप छान आहे. यामधे माझी भूमिका फार वेगळी आहे. प्रचंड आक्रमकता, रुबाबदारपणा, लहानपणापासूनच काही विचार मनात बिंबवले गेले आहेत की, स्त्री कायम चूल व मूल सांभाळू शकते. त्यामुळे त्या भूमिकेचा स्वभाव तसा आहे. संकेत म्हणून मला स्त्रियांबद्दल नेहमीच अभिमान वाटतो. स्त्री शेतात नांगर चालवण्यापासून ते विमान उडवण्यापर्यंत पोहचली आहे. स्त्री कोणत्याच क्षेत्रात मागे नाही आहे पण आजही काही भागात स्त्रिया चूल व मूल सांभाळताना दिसतात. खेडेगावात स्त्री स्वतःच्या पायावर खंबीर उभी राहू शकत नाही अशी विचारसरणी आहे."
पुढे अभिनेता म्हणाला की, "मालिकेच्या माध्यमातून आम्हाला आधुनिक विचार प्रेक्षकांपर्यंत पोहचवता येत आहेत.त्यामुळे मालिकेच्या माध्यमातून खेड्यागावातील स्त्रियांचं जीवन बदलेल एवढं नक्की. या मालिकेसाठी माझी निवड कोल्हापूरच्या अंबाबाईने केली अस म्हणायला हरकत नाही. कारण जवळपास महिनाभर ऑडिशन सुरू होते पण तरीही मध्यंतरी भूमिका मिळेल याची खात्री नव्हती. काही दिवसांनी मला माझं सिलेक्शन झालं असल्याचा कॉल आला. आता आनंद गगनात मावेनसा झाला आहे."