ऑक्सिजन देऊनही श्वास...; मृत्यूच्या दारातून परत आले विद्याधर जोशी, फुफ्फुसाचा झाला होता गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:23 PM2024-03-14T12:23:26+5:302024-03-14T12:26:40+5:30

"डॉक्टरांनी सांगितलं ८३ टक्के फुप्फुस निकामी झालं...", विद्याधर जोशींना झाला होता गंभीर आजार, म्हणाले - Lung Transplant केल्यानंतर...

marathi actor vidyadhar joshi undergoes lung transplant surgery talk about lung illness | ऑक्सिजन देऊनही श्वास...; मृत्यूच्या दारातून परत आले विद्याधर जोशी, फुफ्फुसाचा झाला होता गंभीर आजार

ऑक्सिजन देऊनही श्वास...; मृत्यूच्या दारातून परत आले विद्याधर जोशी, फुफ्फुसाचा झाला होता गंभीर आजार

विद्याधर जोशी हे मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेता आहेत. आजवर अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं आहे. पण, 'जीवाची होतीया काहिली' या मालिकेतून त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अचानक एक्झिट घेतली. तेव्हा ते फुप्फुसाच्या गंभीर आजाराशी सामना करत होते. विद्याधर जोशी यांना फुप्फुसाचा आजार झाला होता. पण, या आजारावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली आहे. हा संपूर्ण अनुभव त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे. 

प्रेक्षकांचे लाडके बाप्पा म्हणजेच विद्याधर जोशी यांनी नुकतीच पत्नीसह 'मित्र म्हणे' पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील या कठीण काळाबद्दल भाष्य केलं. गंभीर आजार झाल्यानंतर त्यांना Lungs Transplant सर्जरीही करावी लागली. हा अनुभव सांगताना ते म्हणाले, "आमचं घर तिसऱ्या मजल्यावर असल्याने मी नेहमी चढून जायचो. पण, जिने चढताना धाप लागत असल्याचं मला जाणवायला लागलं. सुरुवातीला दुर्लक्ष केलं. डॉक्टरांनीही सांगतिलं वयामुळे असेल. पण, नंतर त्रास वाढायला लागल्यानंतर टेस्ट केल्या तेव्हा कळलं की फुप्फुसावर जखम दिसत आहे. त्यानंतर मग मला लंग फायब्रॉसिस झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यात १३ टक्के फुप्फुस निकामी झाल्याचं दाखवत होते. यावर काही औषध नाही आणि हा आजारही बरा होऊ शकत नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. पण, यावर २ गोळ्या आहेत. ज्यामुळे या आजाराच्या वाढण्याचा वेग आपण कमी करू शकतो, असं डॉक्टरांनी सुचवलं. त्यानुसार मग आम्ही  त्या गोळ्या घेण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी १४ टक्के फुप्फुस निकामी झालं होतं. पण, त्यानंतर महिन्याभरातच माझं फुप्फुस ४३ टक्के निकामी झालं होतं." 

"नंतर मला ब्रश केलं तरी धाप लागायची. वॉशरुमला जाऊन आल्यावर श्वास घ्यायला त्रास व्हायचा. ३१ डिसेंबरला आम्ही मला थोडं बरं वाटावं म्हणून पार्टी करायचं ठरवलं होतं. पण, मला खूपच त्रास होत होता, त्यामुळे मी पत्नीला सांगितलं की हॉस्पिटला जाऊया. हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर चार पावलं चालल्यावर मी लगेचच खाली पडलो. मला ऑक्सिजन लावलं गेलं. ऑक्सिजन देऊनही मला श्वास घेता येत नव्हता. त्यामुळे मला व्हेंटिलेटर लावायला लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. माझ्या जवळपास ५०-६० टेस्ट केल्या. डॉक्टरांनी पत्नीला सांगितलं होतं की तुम्ही यासाठी प्रयत्न करू नका. कारण तोपर्यंत माझं फुप्फुस ८३ टक्के निकामी झालं होतं. व्हेटिंलेटर काढा आणि त्यांना शांतपणे मरू द्या, असं माझ्या पत्नीला डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण, तिला मला काहीही करून वाचवायचं होतं. यातून बाहेर काढायचं होतं. व्हेंटिलेटवर पण श्वास घ्यायला पुरत नव्हता. त्यामुळे फुप्फुस ट्रान्सप्लांट करणार असाल तर एक्मो मशीनवर ठेवावं लागेल असं डॉक्टर म्हणाले. त्याचं एका दिवसाचं भाडं १ लाख रुपये होतं," असं त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, "फुप्फुस ट्रान्सप्लांट करणार असतील तरच एक्मो मशीन लावलं जातं. नाहीतर पेशंटला व्हेंटिलेटरवरच ठेवलं जातं.  पण, एक्मोवर ठेवल्यानंतर त्याचा दुसऱ्या अवयवांवरही परिणाम होऊ शकतो. ४ तारखेला मला एक्मोवर ठेवलं आणि १२ तारखेला मला फुप्फुस मिळालं. फुप्फुस ट्रान्सप्लांट झाल्यानंतर काही काळ डॉक्टर तसंच ते उघडं ठेवतात. कारण, पुन्हा काही झालं तर चिरफाड करावी लागू नये. मला ऑपरेशनंतर केवळ ७२ तास तसं ठेवलं होतं. पण, ७२ तासांनंतरही मी शुद्धीवर आलो नव्हतो. तेव्हा मग माझ्या पत्नीला त्यांनी सांगितलं की मी तुम्ही त्यांना आवाज द्या. आम्ही हाक देऊनही ते शुद्धीवर येत नाहीयेत. पीपीई किट घालून माझी पत्नी आली. डॉक्टर मला विद्याधर म्हणून हाक मारत होते. पण घरी मला राजन आणि बाहेर बाप्पा म्हणतात. पत्नीने राजन म्हणून हाक मारल्यानंतर मी लगेच डोळे उघडले."

Web Title: marathi actor vidyadhar joshi undergoes lung transplant surgery talk about lung illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.