"कमी फॉलोअर्समुळे मला सिनेमातून काढलं.."; मराठी अभिनेत्याने मांडली व्यथा, प्रसाद ओकविषयी काय म्हणाला?
By देवेंद्र जाधव | Updated: August 25, 2025 16:50 IST2025-08-25T16:47:08+5:302025-08-25T16:50:33+5:30
एका प्रसिद्ध अभिनेत्याने सिनेमात निवड होऊनही कमी फॉलोअर्समुळे सिनेमातून मला काढण्यात आलं, असा वेदनादायी किस्सा शेअर केला आहे

"कमी फॉलोअर्समुळे मला सिनेमातून काढलं.."; मराठी अभिनेत्याने मांडली व्यथा, प्रसाद ओकविषयी काय म्हणाला?
मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता प्रसाद ओकने रिलस्टारबद्दल केलेलं विधान चर्चेत आहे. त्यामुळे अनेकांनी प्रसादच्या म्हणण्याला समर्थन दिलं आहे. अशातच 'स्वराज्यजननी जिजामाता', 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता महेश बेलदर याने प्रसाद ओकच्या म्हणण्याला समर्थन दिलं आहे. याशिवाय गेल्या काही दिवसात फॉलोअर्स कमी असल्याने एका सिनेमातून कसं काढून टाकण्यात आलं, याची दुःखद कहाणी त्याने शेअर केली आहे.
फॉलोअर्स कमी असल्याने मला काढलं
महेश बेलदरने सोशल मीडियावर प्रसाद ओकचा व्हिडीओ शेअर करुन सांगितलं की, "प्रसाद ओक सरांनी जो मुद्दा मांडला तो अतिशय समर्पक आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. हा विषय मांडणं खूप गरजेचं होतं. काही दिवसांपूर्वी मी एका फिल्मसाठी ऑडिशन दिली. त्या फिल्ममध्ये माझं सिलेक्शन सुद्धा झालं होतं, असा मला प्रॉडक्शनमधून कॉल आला. तारखाही देण्यात आल्या."
"पण नंतर त्यांनी माझी इन्स्टाग्राम प्रोफाईल मागवली. माझे फॉलोअर्स जास्त नाहीत. ते फॉलोअर्स बघून त्यांनी मला कॉल केला. ते मला म्हणाले की, तुम्हाला त्या रोलविषयी कळवतो. त्या डेट्स काही तुम्ही गृहीत धरु नका. आम्ही तुम्हाला कॉल करतो, असं बोलून आजपर्यंत मला काही त्यांच्याकडून कॉल आलेला नाहीये."
"तुम्ही इन्स्टाग्राम फॉलोअर्स बघून जर भूमिका देणार असाल तर मग गल्लीतल्या एका शेंबड्या पोराचे फॉलोअर्सही मिलियनमध्ये आहेत. १ लाखात आहेत. त्यांना घ्या. हे चुकीचं आहे. आज प्रसाद ओक सरांनी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जो मुद्दा मांडला तो एकदम बरोबर आहे. रील करणारा प्रत्येक जण स्वतःला अभिनेता समजायला लागलाय. काहीपण रील टाकतात आणि स्वतःला अॅक्टर समजतात. असो! शेवटी एवढंच सांगेल इन्स्टाग्रामच्या फॉलोअर्सवरुन कोणाला जज करु नका. टॅलेंट असेल तर काम द्या. नसेल तर स्पष्ट सांगा."
प्रसाद ओक काय म्हणाला?
प्रसाद ओकने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एक स्कीट बघून त्याची प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "हा अत्यंत महत्वाचा विषय होता की रील्स करुन आपण अभिनेते किंवा अभिनेत्री आहोत असं ज्यांना ज्यांना वाटायला लागलंय हा प्रचंड मोठा गैरसमज समाजात पसरत चाललेला आहे. ज्यांच्या रील्सला काही हजार, मिलियन, बिलियन व्ह्यूज आहेत, फॉलोअर्स आहेत त्यांचं नाटक बघायला १० माणसंही येत नाहीत हे तथ्य आहे."
"त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल की आपण रील करुन स्टार होऊ शकतो तर हा खूप मोठा भ्रम आहे. रील्स म्हणजे अभिनय अजिबात नाही. हा इतक्या महत्वाचा विषय अगदी हलक्या शब्दात तुम्ही मांडलात. ज्यांना कळायचं होतं शिकायचं होतं ते शिकतील नाही तर त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. आपण आपलं काम केलं."