"रिटायर झाले अन् दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन...", वडिलांच्या आठवणीत भाऊ कदम झाले भावुक, काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 13:40 IST2025-11-09T13:36:47+5:302025-11-09T13:40:01+5:30
वडिलांविषयी बोलताना भाऊ कदम यांच्या डोळ्यात अश्रू, म्हणाले...

"रिटायर झाले अन् दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन...", वडिलांच्या आठवणीत भाऊ कदम झाले भावुक, काय घडलेलं?
Bhau Kadam: आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे भाऊ कदम. ‘फू बाई फू’, ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमांतून भाऊ कदम यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. तर नाटक, मालिका, सिनेमा अशा विविध ठिकाणी भाऊ कदम यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. परंतु, त्यांचा हा प्रवास फार काही सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. मात्र, त्यांचं हे यश पाहण्यासाठी त्यांचे वडील हयात नव्हते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाऊ कदम यांनी भावुक किस्सा शेअर केला आहे.
सध्याच्या घडीला भाऊ कदम हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय असणारे अभिनेते म्हणून ओळखले जातात. परंतु, प्रसिद्धीझोतात येण्यापूर्वी भाऊ कदम यांच्या वडिलांचं निधन झालं आणि संपूर्ण कुटुबांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. नुकत्याच मित्र म्हणे या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रातील प्रवासावर भाष्य केलं. याचदरम्यान, घरच्या परिस्थितीविषयी सांगताना ते म्हणाले,"मी कॉलेज करेपर्यंत वडील जॉबला होते. त्यामुळे मी नोकरी करावी अशी गरज नव्हती. मी सांगायचो त्यांना, तुमच्याइथे माझ्यासाठी नोकरी बघा. तर ते नको म्हणायचे. क्लिअरिंग एजंटचा जॉब होता आणि कोणीही मला फसवू शकतं, याची त्यांना भीती होती. ह्या सगळ्यात मी नाटक आणि एकांकिका करत होतो. वडील रिटायर झाले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ते वारले. त्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर आली. आम्हाला बीपीटीमध्ये लाईट बिल भरायचं, पाणी बिल भरायचं काहीच माहित नव्हतं. कारण, कंपनी भरायची. माझं असं झालं, काय करू आता?"
वडिलांच्या आठवणीत भाऊ कदम यांच्या डोळ्यात अश्रू...
त्यानंतर वडिलांच्या निधनाचा प्रसंग सांगत ते म्हणाले, "ते अॅडमिट होते हॉस्पिटलमध्ये. ते कधी कोणाच्या बाईकवर बसले नाहीत. फक्त काम घर एवढंच होतं त्यांचं. रिटायर होण्याच्या १५ दिवस आधी ते बाईकवर बसले कोणाच्यातरी आणि ती बाईक स्पीड-ब्रेकरवर आदळली. त्यांच्या कमरेचं हाड सटकलं आणि ते खूप घाबरायचे, त्यामुळे ते घाबरले. रिटायर होण्याच्या दिवशी सही करून दिली त्यांनी, तेव्हा रिटायर झाले आणि दुसऱ्या दिवशी गेले. त्यांनी पैसा बघितला नाही, काहीच नाही. आज त्यांना जे दाखवायचं होतं, ते राहिलं. ते गेल्यानंतर सहा महिन्यात घर सोडायचं होतं. पण, सहा महिने मी काहीच काम करत नव्हतो. वडिलांचे पैसे होते, त्यात डोंबिवलीला घर घेतलं. दुकान घेतलं. त्यावेळी मी चार-पाच नोकऱ्या केल्या." असा भावुक किस्सा भाऊ कदम यांनी शेअर केला.