'येड लागलं प्रेमाचं'मध्ये बिबट्याची दहशत, मालिकेतून जनजागृतीचा प्रयत्न, अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:42 IST2025-11-24T13:41:57+5:302025-11-24T13:42:38+5:30
Yed Lagala Premacha Serial : सध्या मालिकेत राया आणि मंजिरीच्या लग्नाची लगबग सुरु आहे. ऐन मेंदीच्या कार्यक्रमात बिबट्याच्या हल्याने गावात दहशत पसरणार आहे.

'येड लागलं प्रेमाचं'मध्ये बिबट्याची दहशत, मालिकेतून जनजागृतीचा प्रयत्न, अभिनेता म्हणाला...
महाराष्ट्रात अलीकडच्या काळात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली असून अनेक निष्पाप नागरिकांनी यातून आपले प्राण गमावले आहेत. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा आणि जनजागृतीचा गंभीर मुद्दा म्हणून हा विषय राज्यभर चर्चेत आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीने मालिकांच्या माध्यमातून विविध सामाजिक मुद्यांना नेहमीच हात घातला आहे. याच परंपरेला पुढे नेत येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये देखील बिबट्याची वाढती दहशत, सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम आणि बचावासाठी घ्यायची काळजी यावर भाष्य केलं जाणार आहे.
सध्या मालिकेत राया आणि मंजिरीच्या लग्नाची लगबग सुरु आहे. ऐन मेंदीच्या कार्यक्रमात बिबट्याच्या हल्याने गावात दहशत पसरणार आहे. याआधीही राया-मंजिरीच्या आयुष्यात अनेक संकटं आली. दोघांनीही एकमेकांची साथ देत या संकटाचा धैर्याने सामना केलाय. बिबट्याच्या रुपात आलेल्या या नव्या संकटातून राया-मंजिरी कशी सुटका करणार हे मालिकेच्या पुढच्या भागांमधून पहाणे कमालीचे ठरेल.
अभिनेता विशाल निकम म्हणाला, ''महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बिबट्यांच्या हल्यामध्ये आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. ऐकलं तरी अंगावर शहारे येतात. येड लागलं प्रेमाचं मालिकेतही बिबट्याच्या हल्ल्याने दहशत पसरणार आहे. अशा परिस्थितीत घाबरून न जाता काय उपाययोजना केल्या जाव्यात यावर भाष्य केलं जाणार आहे. वनविभागाच्या सूचनांचे पालन करा. बिबट्या दिसल्यास वनविभागाला त्वरित कळवा लगेच जेणेकरून योग्य उपाययोजना करता येतील. बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात सतर्क रहा. एकट्याने जाणं टाळा, शक्य झाल्यास गटाने चला. रस्ते, घराचे प्रवेशद्वार आणि बाहेरील भाग पुरेशा प्रकाशात ठेवा. लहान मुलांना एकटे सोडू नका अश्या अनेक गोष्टी मालिकेच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा प्रसंग साकारणं मोठी जबाबदारी होती.''
''हा विषय हाताळणं म्हणजे संवेदनशील पाऊल आहे''
तर मंजिरी म्हणजेच पूजा बिरारी म्हणाली, ''बिबट्यांचे हल्ले, त्यामागील कारणं आणि बचावासाठीचे उपाय काय असावेत हा विषय मालिकेतून हाताळणं म्हणजे संवेदनशील पाऊल आहे असं वाटतं. सध्या बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावरामुळे सगळीकडेच भीतीचं वातावरण आहे. भयाची वास्तविकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. परिस्थितीचं गांभीर्य राखून आम्ही या विषयावर भाष्य करणार आहोत.''