जाणून घ्या ९ ऑक्टोबरला काय घडले बिग बॉसच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 17:03 IST2017-10-10T11:18:27+5:302017-10-10T17:03:39+5:30
रेश्मा पाटील बिग बॉसचा आजचा दिवस हा नॉमिनेशनचा असल्याने घरातील वातावरण तंग होते. शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यामध्ये ...
.jpg)
जाणून घ्या ९ ऑक्टोबरला काय घडले बिग बॉसच्या घरात
बिग बॉसचा आजचा दिवस हा नॉमिनेशनचा असल्याने घरातील वातावरण तंग होते. शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यामध्ये तर पहिल्याच दिवसापासून आपल्याला भांडणे पाहायला मिळत आहेत. त्यांच्यातील हा वाद हा भाभीजी घर पर है या मालिकेपासूनचा आहे. शिल्पाला ही मालिका काही कारणास्तव सोडावी लागली होती. ही मालिका शिल्पाच्या हातून जाण्यात विकासचा देखील हात असल्याचे तिला वाटत असल्याने ती पहिल्या दिवसापासून त्याच्यासोबत भांडत आहे. एवढेच नव्हे तर शिल्पा त्याला सतत चिडवत असते. त्याच्या जवळ जाऊन ये तो बन गया कुत्ता असे गाणे गाऊन त्याला अनेक वेळा डिचवते. या सगळ्या गोष्टी विकास अनेक दिवसांपासून ऐकून घेत होता. पण त्यांचा संयम सुटला असून तो प्रचंड भडकला. त्याने घरातील अंडी फेकायला सुरुवात केली. त्यामुळे घरातील सगळीच मंडळी त्याच्यावर भडकली.
हिना खानने परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ नये यासाठी विकासला समजावले आणि त्याने फेकलेल्या अंड्याचा कचरा त्याला गोळा करायला सांगितला. हिना पहिल्या दिवसापासून खूप चांगला खेळ खेळत आहे. कधी ती संस्कारी बहूप्रमाणे सगळ्यांशी चांगली वागते तर कधी ती आपली बाजू मांडताना चिडते. सलमानसमोर देखील आपली बाजू मांडताना ती मागे-पुढे पाहात नाही.
ज्योती कुमार पहिल्या आठवड्यात सगळ्यांशी उद्धटपणे वागत असल्याने सगळ्यांनी तिला घराच्या बाहेर काढण्यासाठी मते दिली होती. पण यावेळी तिला घराच्या बाहेर कोणी काढू नये यासाठी तिने जोरदार प्रयत्न केला. सगळ्यांशी ती अतिशय चांगल्याप्रकारे वागली. घराच्या बाहेर जाण्यासाठी तिला बंदगीने वाचवले तर ती बंदगीला वाचवेल असे तिने बंदगीला सांगितले होते. पण बंदगीला ठेंगा दाखवत तिने घरातून बाहेर जाण्यासाठी तिला नॉमिनेट केले. पण तिने केलेल्या या गोष्टीची तिला चांगलीच शिक्षा झाली. काल बिग बॉसच्या घरात चार शेजाऱ्यांची एंट्री झाली. एका कोणत्याही स्पर्धकाला डायरेक्ट नॉमिनेट करण्याचा हक्क त्यांना देण्यात आला होता. त्यांनी ज्योतीला नॉमिनेट केले. या चार जणांना बिग बॉसने एक टास्क दिले आहे. या टास्कनुसार हे चार जण एकाच कुटुंबातील आहे हे घरातल्यांना पटवून द्याचचे आहे. घरातल्यांना ते हे पटवू शकले तरच ते या घरात राहू शकतात असे बिग बॉसने त्यांना सांगितले आहे. पण चौघांची बोलण्याची ढब, त्यांचे उच्चर, नाव-आडनावं खूप वेगळी असल्याने घरातल्यांना हे पटवून देताना त्यांच्या नाकी नऊ येणार आहे.
बिग बॉसच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये तर खूपच मजा आली. कारण विकाससोबत गेल्या काही दिवसांपासून शिल्पा भांडत आहे. आता त्याचा आणि हिनाचा देखील वाद झाला असून त्यामुळे त्याने बिग बॉसच्या घराच्या भिंतीवरून उडी मारली आहे. आता पुढे काय होते हे पाहाणे रंजक ठरणार आहे.
कालच्या भागात हिना खान, विकास गुप्ता, सपना चौधरी, हितेन तेजवानी, पुनीत आणि शिवीनी दुर्गा यांना नामांकन मिळाले. आता यातून घराच्या बाहेर कोण जाते हे लवकरच लोकांना कळेल.
(रेश्मा पाटीलने बिग बॉसच्या घरातील या घडामोडी टिपल्या असून ती बिग बॉसची मोठी फॅन आहे. तिने आजवर कधीच कोणत्याच सिझनचा कोणताच भाग मिस केलेला नाही.)
Also Read : बिग बॉसचा हा स्पर्धक आहे कास्टिंग काऊचसाठी कारणीभूत