"गळा भरून आलाय", बाबामहाराजांच्या निधनाने संकर्षण भावुक, म्हणाला, "आजवर वारीला जाण्याचं भाग्यं लाभलं नाही, पण त्यांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 04:21 PM2023-10-26T16:21:39+5:302023-10-26T16:22:34+5:30

"आज बाबा महाराजांना भेटून साक्षात परमेश्वर पण त्यांच्याच आवाजात...", संकर्षण कऱ्हाडेची भावुक पोस्ट

kirtankar baba maharaj satarkar passed away marathi actor sankarshan karhade shared emotional post | "गळा भरून आलाय", बाबामहाराजांच्या निधनाने संकर्षण भावुक, म्हणाला, "आजवर वारीला जाण्याचं भाग्यं लाभलं नाही, पण त्यांनी..."

"गळा भरून आलाय", बाबामहाराजांच्या निधनाने संकर्षण भावुक, म्हणाला, "आजवर वारीला जाण्याचं भाग्यं लाभलं नाही, पण त्यांनी..."

ज्येष्ठ कीर्तनकार नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे (Nilkanth Dnyaneshwar Gore) म्हणजेच बाबामहाराज सातारकर यांचे निधन झाले. ८९व्या वर्षी बाबामहाराज सातारकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अनोख्या कीर्तन शैलीच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्म आणि भागवत संप्रदायाचा विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवला. केवळ महाराष्ट्रच नाही तर जगभरात त्यांच्या कीर्तनाचे भरपूर कार्यक्रम झाले. त्यांच्या निधनानंतर शोककळा पसरली आहे. मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने त्यांना पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. 

बाबा महाराजांच्या निधनानंतर संकर्षणने भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने बाबा महाराजांच्या आठवणी सांगितल्या आहेत. 

संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

बाबा महाराज सातारकर 🙏🏻 
फार वाटायचं कधीतरी तुमच्या समोर बसून , प्रत्यक्ष तुम्हाला पाहत, तुमचा अभंग, किर्तन, प्रवचन ऐकावं...आता ती संधी नाही…. गळा भरून भरून आलाय ...
माझ्या लहानपणी बाबांनी नवीन कॅसेट प्लेअर आणला होता. त्यावर लावलेली पहिली कॅसेट बाबा महाराजांची “आम्ही दैवाचे दैवाचे”. ती ऐकतांना पहिल्यांदा मला “तुकोब्बा , नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि “रूक्मीणी पांडूरंग” ह्यांची बाबा महाराजांच्या गोड आवाजात “दास पंढरी रायांचे” हे ऐकत ओळख झाली.

आजी आजोबांनी अनेक वर्षं वारी केली. चातुर्मासात चारही महिने पंढरपूरी मुक्कामी असायचे. आल्यावर आजी म्हणायची, "काय सांगू तुम्हाला पोरांनो...बाबा महाराज प्रवचनात बोलताना त्यांच्या तोंडातून शब्द मोत्यांसारखे बाहेर पडतात आणि डोळ्यांत माणिक चमकतात." हे वर्णन ऐकून त्यांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. तोच चेहरा डोळ्यासमोर आणून रोज सकाळी त्यांच्या आवाजात हरिपाठातल्या “बहुत् सुकृताची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी” हे ऐकतांना कित्ती गोड वाटतं काय सांगू ?

प्रवचन करताना एखाद्या वाक्यानंतर “काय ….?” किंवा किर्तनात अभंग गाताना लय वाढवण्यासाठी केलेलं “हं हं हं हं” हे आपल्याला प्रत्येक क्षणाला गुंतवून ठेवतं, ठेवत राहील !! मला आजवर वारीला जाण्याचं भाग्यं नाही लाभलं पण, बाबा महाराजांनी मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या आवाजानी, स्वरांनी, श्रवणाने वारकरी केलंय.
आज ते आपल्यातनं गेले पण मी तरी ह्या जगात आहे तोवर रोजची सकाळ त्यांच्या आवाजातल्या हरिपाठानेच सुरू करीन!
आज बाबा महाराजांना भेटून साक्षात परमेश्वर पण त्यांच्याच आवाजांत ऐकुन पाठ केलेला अभंग म्हणत असेल “धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंता जन्मीचा शीण गेला”

बाबा महाराज सातारकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी ३ वाजता नेरूळच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Web Title: kirtankar baba maharaj satarkar passed away marathi actor sankarshan karhade shared emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.