मिथिला पालकरने बिग बींना विचारले मराठी शब्दांचे अर्थ, अमिताभ बच्चन म्हणाले- "वाट लागली..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:39 IST2026-01-02T15:38:58+5:302026-01-02T15:39:28+5:30
मिथिलाचा केबीसीमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मिथिला बिग बींची फिरकी घेताना दिसत आहे. ती अमिताभ बच्चन यांना काही मराठी शब्द आणि म्हणी सांगते आणि त्याचे अर्थ विचारते.

मिथिला पालकरने बिग बींना विचारले मराठी शब्दांचे अर्थ, अमिताभ बच्चन म्हणाले- "वाट लागली..."
KBC 17: कौन बनेगा करोडपती हा टेलिव्हिजनवरील सगळ्यात गाजलेला आणि लोकप्रिय शो आहे. सध्या कौन बनेगा करोडपतीचा १७वा सीझन सुरू आहे. काही प्रश्नांची उत्तर देऊन टप्याटप्याने मोठी रक्कम जिंकण्याची संधी या शोमध्ये स्पर्धकांना दिली जाते. या शोमध्ये सेलिब्रिटीही सहभागी होताना दिसतात. नुकतंच मिथिला पालकर, मोना सिंह, शरीब हाशमी यांनी केबीसीमध्ये हजेरी लावली.
मिथिलाचा केबीसीमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मिथिला बिग बींची फिरकी घेताना दिसत आहे. ती अमिताभ बच्चन यांना काही मराठी शब्द आणि म्हणी सांगते आणि त्याचे अर्थ विचारते. "मी मुंबईची मुलगी आहे. काही मुंबईच्या भाषेतील म्हणी मी तुम्हाला सांगेन. तुम्ही त्याचे अर्थ सांगा", असं मिथिला बिग बींना म्हणते. त्यानंतर मिथिला अमिताभ बच्चन यांना शहाणा शब्दाचा अर्थ विचारते. त्यावर बिग बी उत्तर देत म्हणतात, "शहाणा म्हणजे काय ते मला माहित आहे. शहाणा म्हणजे हुशार". त्यानंतर ती "सुमडीत कोंबडी" या म्हणीचा अर्थही विचारते. पण, यावर बिग बी निरुत्तर होतात.
मग शरीब हाशमी त्यांना याचा अर्थ समजावून सांगतो. "जेव्हा दिवाळीत मिठाई घरी येते तेव्हा तुम्हाला एकच खाण्याची परवानगी असते. मात्र रात्री झोपल्यावर तुम्ही कोणी नसताना सुमडीत ती मिठाई खाता". त्यानंतर बिग बींना या म्हणीचा अर्थ समजतो. ते म्हणतात, "अच्छा म्हणजे लपून छपून. आज रात्री मी हे करून बघेन". मग मिथिला अमिताभ यांना "वाट लागली" म्हणजे काय विचारते. तेव्हा बिग बी खूप मजेशीर पद्धतीने उत्तर देताना म्हणतात की "माझी वाट लागली आहे इथे बसून... मग सगळेच हसायला लागतात".