‘केबीसी 13’मध्ये जाणं या रेल्वे कर्मचाऱ्यास पडलं महाग, चुकवावी लागणार जबर ‘किंमत’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 18:35 IST2021-08-30T18:31:56+5:302021-08-30T18:35:46+5:30
Kaun Banega Crorepati 13 : अनेक वर्षांपासूनचे आपले स्वप्न पूर्ण झाल्यानं ते आनंदी होते. पण...

‘केबीसी 13’मध्ये जाणं या रेल्वे कर्मचाऱ्यास पडलं महाग, चुकवावी लागणार जबर ‘किंमत’!!
छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक लोकप्रिय शो कोणता तर ‘कौन बनेगा करोडपती’. नुकताच या शोचा 13 वा (Kaun Banega Crorepati 13) सीझन सुरू झाला. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट करत असलेल्या या शोच्या हॉटसीटवर बनण्याचं स्वप्नं अनेकजण पाहतात. काही तर केवळ अमिताभ बच्चन यांना बघता यावं, यासाठीही या शोमध्ये जातात. पण एखाद्या स्पर्धकांला हे स्वप्नं प्रत्यक्षात जगणं महागातही पडू शकतं. होय, एका स्पर्धकासोबत असंच काही घडलं. या स्पर्धकाचं नाव आहे देशबंधू पांडे.
‘कौन बनेगा करोडपती 13’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागामध्ये राजस्थानच्या कोटा येथे राहणारे रेल्वे अधिकारी देशबंधू पांडे (Deshbandhu Pandey) सहभागी झाले होते. शोमध्ये पांडे यांनी 3 लाख 40 हजार रुपये जिंकले. मात्र ही रक्कम जिंकण्यापेक्षा या शोच्या निमित्तानं आपल्याला अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट-सीटवर बसून हा खेळ खेळता आला, याचा आनंद त्यांना झाला होता. अनेक वर्षांपासूनचे आपले स्वप्न पूर्ण झाल्यानं ते आनंदी होते. पण त्यांचा हा आनंद काहीच काळ टिकला. कोटा येथे परतत नाही तोच रेल्वे प्रशासनाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली.
का झाली कारवाई?
केबीसी शोमध्ये भाग घेण्यासाठी पांडे 9-13 ऑगस्टदरम्यान चार दिवस मुंबईत होते. यासाठी त्यांनी रजा घेतली होती. तसा अर्जही त्यांनी आपल्या वरिष्ठांना दिला होता, मात्र त्यांचा रजेचा अर्ज नाकारण्यात आला होता. याऊपरही रजा मंजूर नसतानाच पांडे केबीसीत सहभागी होण्यासाठी मुंबईला गेले आणि कामावर गैरहजर राहिले असा आरोप करत रेल्वे प्रशासनानं त्यांना नोटीस बजावली.
पगारवाढही रोखली
न्यूज 18 नं दिलेल्या वृत्तानुसार, देशबंधू पांडे यांची तीन वर्षापर्यंत पगारवाढही रोखण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी रेल्वे कर्मचारी संघटनेनं रेल्वे प्रशासनाच्या करवाईचा तीव्र निषेध नोंदवला आहे. यावर रेल्वे प्रशासनाने मात्र मौन बाळगले आहे. या प्रकरणी आणखी तपशील मिळालेला नाही.