"मी ते काम कधीच करणार नाही..." जुई गडकरी नेमकं काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 16:44 IST2025-10-12T16:12:02+5:302025-10-12T16:44:41+5:30
जुई गडकरीने आतापर्यंत सोज्वळ भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.

"मी ते काम कधीच करणार नाही..." जुई गडकरी नेमकं काय म्हणाली?
Jui Gadkari Talks About On Screen Bold Scenes: मराठी मनोरंजन विश्वात काही अभिनेत्रींनी आपली एक विशिष्ट ओळख जपली आहे. अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांचा बोल्ड सीन करण्यास सपशेल नकार आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी. जुई गडकरीने आतापर्यंत सोज्वळ भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. अनेक मालिकांमध्ये तिने आदर्श सुनेची, मुलीची भूमिका निभावली. अंगप्रदर्शन किंवा बोल्डनेस दाखवणारे सीन्स करण्यास तिचा विरोध आहे. यावर नुकतंच एका मुलाखतीमध्ये तिनं भाष्य केलंय.
जुईनं नुकतंच 'मुंटा'शी संवाद साधला. यावेळी तिनं बोल्ड सीन्स करण्याबद्दल भाष्य केलं. "'काही गोष्टी तुला करायच्या नाहीत', असं म्हणालीस, ते नेमकं काय ?" असा प्रश्न जुईला विचारण्यात आला. यावर जुई म्हणाली, "मला 'बोल्ड' कन्टेंटमध्ये काम करायचं नाही. मी तशा प्रकारचं काम करायला कम्फर्टेबल नाही. माझे आई-बाबा, प्रेक्षक यांच्या मनातला माझ्याविषयीचा आदर कमी होईल, असं मी काही करणार नाही. कलाकार म्हणून करावं लागतं, असं तर मला अजिबातच वाटत नाही. तेच केलं की, तुम्हाला वेगळ्या प्रकारे अभिनय येतो, हे सिद्ध होत नाही. त्यामुळे मी ते कधीच करणार नाही", असं स्पष्ट मत तिनं मांडलं.
जुई सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. ही मालिका कायमच टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असते. या मालिकेत जुई साकारत असलेली सायली प्रेक्षकांना आवडते. जुईसोबत मालिकेत अमित भानुशाली, प्रिया तेंडोलकर, मोनिका दाभाडे, प्रतिक सुरेश हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जुई सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. ती वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्सही चाहत्यांना देत असते.