जुई गडकरीने आश्रमातील आजी-आजोबांची दिवाळी केली गोड, 'शांतीवन'ला दिली 'इतक्या' लाखांची मदत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 09:54 IST2025-10-15T09:53:27+5:302025-10-15T09:54:00+5:30
अभिनेत्री जुई गडकरी हिने दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्ताने यावर्षी ही शांतीवन आश्रमाला भेट दिली. नेमकं तिने तेथे काय-काय खास केलं? वाचा...

जुई गडकरीने आश्रमातील आजी-आजोबांची दिवाळी केली गोड, 'शांतीवन'ला दिली 'इतक्या' लाखांची मदत!
जेव्हा एखादा कलाकार पडद्यावरील भूमिकेशिवाय रिअल लाईफमध्येही सामाजिक बांधिलकी जपतो, तेव्हा ती गोष्ट खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरते. 'ठरलं तर मग' मालिकेतील जुई गडकरी सध्या याच कारणामुळे चर्चेत आहे. जुई फक्त पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही एक 'सुपरस्टार' आहे. गेल्या २० वर्षांपासून जुई न चुकता दिवाळीचा सण शांतीवन आश्रमातील आजी-आजोबांसोबत साजरा करते आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवते. जुईच्या या उपक्रमात आजवर कधीही खंड पडलेला नाही.
यंदाही जुईनं मित्रपरिवारासह मिळून पूर्ण आश्रम सजवलंय आणि तब्बल दीड लाखांची मदत केली आहे. जुईनं केवळ पैसे देऊन कर्तव्य पूर्ण केले नाही. तर आपल्या मित्रपरिवारासह आजी-आजोबांसोबत वेळ घालवला, गप्पा मारल्या, त्यांच्यासाठी गाणंही गायलं. यामुळे निराधार आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. जुईच्या या स्तुत्य उपक्रमाचं अनेकांनी कौतुक केले आहे.
जुई कॉलेजच्या दिवसांमध्ये नाटकाच्या तिकिटातून मिळालेले पैसे या आश्रमाला देणगी स्वरुपात द्यायची. आता बरेच जण या उपक्रमाला सढळ हस्ते हातभार लावतात. या रकमेतून आजी-आजोबांचे केवळ दिवाळीपुरतेच नाही, तर वर्षभराचे रेशन, औषधपाणी आणि कपड्यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या जातात. पनवेल येथील शांतीवन आश्रम तिचं दुसरं कुटुंब आहे.
जुई गडकरीची ‘ठरलं तर मग मालिका’ (Tharala Tar Mag) सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत जुई साकारत असलेली सायली देखील अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली आहे. या मालिकेमुळे जुईच्या फॅन फॉलोईंगमध्येही वाढ झाली आहे. जुईने आजवर 'पुढचं पाऊल', 'वर्तुळ' अशा मराठी मालिकांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय जुई बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होती.