'इंडियन आयडॉल' शोमध्ये जसपिंदर नरूला झाल्या भावुक, आठवलं पाहिलं गाणं, जे त्यांनी एका टेकमध्ये केलेलं रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:44 IST2025-11-12T16:43:37+5:302025-11-12T16:44:29+5:30
Jaspinder Narula : इंडियन आयडॉल १६ मधील स्पर्धक श्रेया हिने मनाला भिडणारे गाणं 'तारे हैं बराती' सादर केलं. तिच्या या भावपूर्ण सादरीकरणाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. विशेषतः जसपिंदर नरूला या त्यांच्या बालपणाच्या आठवणीत हरवून गेल्या.

'इंडियन आयडॉल' शोमध्ये जसपिंदर नरूला झाल्या भावुक, आठवलं पाहिलं गाणं, जे त्यांनी एका टेकमध्ये केलेलं रेकॉर्ड
इंडियन आयडॉल १६चा ग्रँड प्रीमियर हा आठवणींनी, संगीताने आणि भावनाांनी भरलेला असा एक अविस्मरणीय सोहळा ठरला, जेव्हा या कार्यक्रमाने आपल्या ‘यादों की प्ले लिस्ट’ या थीम अंतर्गत भव्य प्रीमियर पार्टीसोबत सुरुवात केली. मंच तारकांनी उजळून निघाला, जेव्हा परीक्षक श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह यांच्यासोबत दिग्गज पाहुणे उर्मिला मातोंडकर, सुखविंदर सिंग, हंस राज हंस आणि जसपिंदर नरूला यांनी या नव्या संगीत प्रवासाचा उत्सव साजरा केला.
संध्याकाळचा सर्वात भावनिक क्षण तो होता, जेव्हा स्पर्धक श्रेया हिने मनाला भिडणारे गाणं 'तारे हैं बराती' सादर केलं. तिच्या या भावपूर्ण सादरीकरणाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. विशेषतः जसपिंदर नरूला या त्यांच्या बालपणाच्या आठवणीत हरवून गेल्या. त्या क्षणी स्पष्टपणे भावुक झालेल्या जसपिंदर नरूला यांनी सांगितले की, हे गाणं त्यांना त्यांच्या संगीत प्रवासाच्या सुरुवातीपर्यंत घेऊन गेलं. त्यांनी म्हटलं, ''तू हे गाणं गाण्याचा प्रयत्न केलास, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुझ्या वयात हे इतकं सुंदर गाणं गाणं खरंच विलक्षण आहे. मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं होतं, जेव्हा मी साधारण सात-आठ वर्षांची होते, रेशमा जी यांचा रेकॉर्ड आला होता तेव्हा. माझ्या चुलत भावाने मला हे गाणं ऐकवलं आणि मी तेव्हापासून हे गाणं गाऊ लागले. मी खरंच हे गाणं फक्त एका टेकमध्ये रेकॉर्ड केलं होतं.''
श्रेया घोषाल आणि जसपिंदर नरूला यांनी गायलं गाणं
त्यांची ही भावनिक आठवण लहानपणी ऐकलेल्या गाण्यापासून ते व्यावसायिकरीत्या एका टेकमध्ये रेकॉर्ड करण्यापर्यंतचा प्रवासाला अधिक हृदयस्पर्शी बनवून गेला. यात केवळ स्पर्धकावरील त्यांचा आपुलकीच नव्हे, तर त्या गाण्यावरील आणि त्याच्या वारशावरील त्यांचा आत्मीय भावही झळकला. प्रदर्शनानंतर वातावरण आणखी जादुई बनले, जेव्हा श्रेया घोषाल आणि जसपिंदर नरूला या दोघींनी मंचावर एकत्र येऊन देवदास चित्रपटातील ‘मोरे पिया’ हे गाणं सादर केलं. तब्बल २३ वर्षांनी या दोन दिग्गज गायिका त्या प्रसिद्ध साउंड ट्रॅकवर पुन्हा एकत्र आल्या होत्या. त्यांचे हे संगमगीत प्रेक्षक आणि परीक्षक दोघांसाठी मंत्रमुग्ध करणारा अनुभव ठरला.