'आई तुळजाभवानी' मालिकेत जगदंबा, महिपती-शिवाच्या आयुष्याला मिळणार नवं वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:58 IST2025-12-31T16:58:05+5:302025-12-31T16:58:31+5:30
Aai Tulja Bhavani : 'आई तुळजाभवानी' लोकप्रिय मालिका सध्या कथानकाच्या उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली आहे.

'आई तुळजाभवानी' मालिकेत जगदंबा, महिपती-शिवाच्या आयुष्याला मिळणार नवं वळण
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'आई तुळजाभवानी' सध्या कथानकाच्या उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली आहे, जिथे कथानकातल्या घडामोडी केवळ व्यक्तीगत संघर्षांपुरत्या मर्यादित न राहता मोठ्या नियतीच्या चौकटीत आकार घेताना दिसत आहेत. आतापर्यंत भावनिक चढउतार, नात्यांमधील तणाव आणि न सांगितलेली सत्यं यांभोवती फिरणारी कथा आता एका निर्णायक वळणाकडे आली आहे. याच टप्प्यावर जगदंबाला महादेवांची भक्ती करण्यापासून रोखण्यासाठी महिपतीने रचलेला डाव, आणि तिच्या मार्गात सातत्याने निर्माण केलेले अडथळे, कथेला अधिक धार देत आहेत.
शिवाची भक्ती जगदंबाकडून होऊ नये, यासाठी उभे राहिलेले अडसर, आणि त्यामागील हेतू या सगळ्यांमुळे जगदंबा, महिपती आणि शिव हे तीनही प्रवास एकमेकांच्या अधिक जवळ येताना दिसत असून, त्यांच्या आयुष्यांवर परिणाम करणारा निर्णायक काळ सुरू होण्याची स्पष्ट चाहूल मिळते आहे. या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे ‘दिव्य आवर्तन योग’ एक असा क्षण, जो आकाशातील संयोगांइतकाच मानवी रूपातील देव आणि असुरांच्या अंशाला प्रभावीत करणारा आहे. हा योग जगदंबासाठी अंतर्मुख करणारा असून, तिला अस्पष्ट कळणाऱ्या संकेतांमधून काहीतरी मोठा बदल घडणार असल्याची जाणीव देतो आहे. शिवासाठी हा योग केवळ एक घटना नसून, तो स्वतःच्या निर्णयांबाबत अधिक सजग होण्याचा आणि परिवर्तन स्वीकारण्याचा टप्पा ठरतो आहे. तर महिपतीसाठी हा काळ अधिक अस्वस्थ करणारा आहे कारण जगदंनबाला प्राप्त करण्याची त्याला घाई करावी लागणार आहे. हा योग आई तुळजाभवानीच्या कथेला अधिक अर्थपूर्ण आणि दैवी रचनेच्या नव्या टप्प्याकडे नेणारा आहे.
दिव्य आवर्तन योगमुळे मालिकेला येणार वेगळं वळण
दिव्य आवर्तन योग हा आई तुळजाभवानी मालिकेला वेगळं वळण देऊन जाणार हे निश्चित आहे. जिथे कर्म, नियती आणि मानवी निर्णय यांचं समीकरण पुन्हा एकदा मांडलं जाणार आहे. या योगानंतर नात्यांची समीकरणं बदलतील का, विश्वासाला तडा जाईल का, आणि आतापर्यंत ठरलेली दिशा अचानक उलटेल का, हे अजून स्पष्ट नाही. मात्र इतकं नक्की या आवर्तनानंतर जगदंबा, शिव आणि महिपती यांच्या आयुष्याचा प्रवास पूर्वीसारखा राहणार नाही. या गूढ, भावनिक आणि निर्णायक टप्प्याची अनुभूती पाहणे कमालीचे ठरणार आहे.