"मी स्वतःला चेटकीणीच्या वेशात पाहिलं, तेव्हा...", रुची जाईलनं सांगितला मालिकेच्या शूटचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 14:17 IST2025-09-25T14:16:48+5:302025-09-25T14:17:54+5:30
Kajalmaya Serial : 'काजळमाया' मालिकेच्या पहिल्या टीझरने सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. या प्रोमोमध्ये दिसणारी, गूढ आणि आकर्षक स्त्री नेमकी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

"मी स्वतःला चेटकीणीच्या वेशात पाहिलं, तेव्हा...", रुची जाईलनं सांगितला मालिकेच्या शूटचा अनुभव
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरू होणाऱ्या 'काजळमाया' (Kajalmaya Serial) मालिकेच्या पहिल्या टीझरने सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. या प्रोमोमध्ये दिसणारी, गूढ आणि आकर्षक स्त्री नेमकी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. ही 'ती' म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून, विलक्षण सौंदर्य आणि तंत्रज्ञानाची शक्ती लाभलेली चेटकीण पर्णिका आहे.
पर्णिकाला कायम तरुण राहण्याचं वरदान मिळालेलं आहे. रूपाने सुंदर असली तरी, पर्णिका अत्यंत स्वार्थी, निर्दयी आणि संधिसाधू आहे. तिचं स्वतःचं अस्तित्व टिकवणं आणि संपूर्ण जगाला आपल्या पायाशी आणणं, या दोन महत्त्वाकांक्षांशिवाय तिच्या मनात कोणताही विचार नसतो. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जायला तयार असते. जेव्हा तिच्या या महत्त्वाकांक्षेला आरुषकडून आव्हान मिळतं, तेव्हा एका अद्भुत आणि गूढ कथेची सुरुवात होते. या मालिकेतून नवोदित अभिनेत्री रुची जाईल मालिका विश्वात पदार्पण करणार आहे. 'पर्णिका'ची आव्हानात्मक भूमिका साकारायला मिळाल्याने रुची खूप उत्साही आहे.
आपल्या भूमिकेबद्दल सांगताना रुची म्हणाली, "माझी ही पहिलीवहिली मालिका आहे, त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. लहानपणापासूनच अभिनयाची मला आवड होती आणि अभिनेत्री बनण्याचं माझं स्वप्न या मालिकेमुळे पूर्ण होत आहे. 'काजळमाया'मध्ये मी एका विलक्षण सुंदर चेटकीणीच्या रूपात दिसणार आहे. ही भूमिका माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. प्रोमो शूटच्या दिवशी जेव्हा मी स्वतःला चेटकीणीच्या वेशात पाहिलं, तेव्हा मीसुद्धा एका क्षणासाठी घाबरले होते! मालिकेचं कथानक जितकं गूढ आहे, तितकंच ते उत्सुकता वाढवणारं आहे. प्रत्येक भागाच्या शेवटी पुढे काय होणार, याची उत्कंठा प्रेक्षकांना नक्कीच वाढेल. नव्या रूपात आणि नव्या माध्यमात मी पदार्पण करत आहे. प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळावं, इतकीच माझी अपेक्षा आहे."