कॅन्सरबद्दल हिना खाननं दिला मोठा इशारा; स्वतःच्या अनुभवातून केला खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 13:55 IST2025-12-24T13:35:05+5:302025-12-24T13:55:42+5:30
अभिनेत्रीने कर्करोगाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

कॅन्सरबद्दल हिना खाननं दिला मोठा इशारा; स्वतःच्या अनुभवातून केला खुलासा!
'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील अक्षराच्या भूमिकेसाठी हिना खान ओळखली जाते. या मालिकेमुळे हिना खान घराघरात पोहोचली. अनेक मालिकांमध्ये हिनाने काम केलं आहे. हिंदी टेलिव्हिजनचा ती लोकप्रिय चेहरा आहे. गेल्याच वर्षी हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात ती होती. ज्यामुळे तिचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं. पण, तरीही हिना थांबली नाही किंवा तिने करिअरला ब्रेक दिला नाही. आता तिची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. ती इतरांना प्रेरणा देत राहते. अलिकडेच, अभिनेत्रीने कर्करोगाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
हिना सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत महिलांमध्ये जनजागृती करत आहे. केवळ वर्षातून एकदा डॉक्टरकडे जाऊन स्कॅन करणे पुरेसे नाही. तिच्या मते, प्रत्येक महिलेने दर १५ ते २० दिवसांनी स्वतःची शारीरिक तपासणी कशी करायची, हे शिकले पाहिजे. ही छोटीशी सतर्कता तुमचे प्राण वाचवू शकते. तसे न केल्यास कॅन्सरचा धोका वाढतो. कॅन्सरचं जितक्या लवकर निदान, तितक्या लवकर उपचार आणि जीव वाचण्याची शक्यता जास्त असते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिनाने सांगितले की, "मी नेहमीच स्वतःच्या शरीराबाबत सतर्क असायचे. मला भीती वाटत होती, म्हणून मी नियमितपणे स्वतःची शारीरिक तपासणी करायचे. याच सवयीमुळे मला माझ्या स्तनात एक गाठ आढळली. मला असं वाटतं की, वर्षातून एकदा स्कॅन करणं पुरेसं नसतं. प्रत्येक महिलेला स्वतःची तपासणी कशी करायची हे शिकवलं पाहिजे आणि दर १५-२० दिवसांनी ही तपासणी केली पाहिजे".
कुटुंबात कर्करोगाचा इतिहास
हिनाने एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे 'अनुवंशिकता'. ज्यांच्या कुटुंबात आई, मावशी किंवा आजीला कॅन्सर झाला असेल, अशा महिलांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे हिनाने अधोरेखित केले आहे. कारण, घरात कॅन्सरचा इतिहास असेल तर तो होण्याची शक्यता जास्त असते. हिना म्हणाली, "आमच्या कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असल्याने, मला याची जाणीव होती की भविष्यात मलाही कॅन्सर होण्याची शक्यता असू शकते. पण ते माझ्यासोबत इतक्या लवकर होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी या आजाराबद्दल पूर्णपणे माहिती घेऊन होते, त्यामुळे निदानानंतर मी डगमगले नाही".