हर्षदा खानविलकरांनी संकल्प पूर्ण केला, वह्या-पुस्तकं देऊन मुलांच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:25 IST2025-11-13T17:24:17+5:302025-11-13T17:25:12+5:30
हर्षदा खानविलकरांनी गरजू मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे.

हर्षदा खानविलकरांनी संकल्प पूर्ण केला, वह्या-पुस्तकं देऊन मुलांच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू
अभिनेत्री हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar) अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांच्या एकापेक्षा एक मालिका गाजल्या आहेत. 'पुढचं पाऊल', 'रंग माझा वेगळा' या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. सध्या त्या 'लक्ष्मी निवास' मालिकेत काम करत आहेत. अभिनयासोबतच हर्षदा खानविलकर नेहमीच सामाजिक कामांमध्ये सक्रियपणे सहभागी होत असतात. नुकताच त्यांनी एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवून गरजू मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे.
"लक्ष्मी निवास" मालिकेची संपूर्ण टीम नुकतंच "चला हवा येऊ द्या" च्या विशेष भागात सहभागी झाली होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिजीत खांडकेकर यांनी हर्षदा खानविलकर यांची 'तुळा' (वजन करून दान) केली. एका बाजूवर हर्षदा खानविलकर बसल्या, तर दुसऱ्या बाजूवर वह्या-पुस्तके ठेवली गेली. तेव्हा हर्षदा यांनी ती वह्या-पुस्तके स्वतः गरुजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.
हा संकल्प पूर्ण करण्यासाठी हर्षदा खानविलकर यांनी थेट सांगली गाठले. त्या सांगली जिल्ह्यातील श्री दत्त विद्यामंदिर, नरसोबाची वाडी येथे स्वतः पोहोचल्या आणि वह्या-पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिली. वह्या-पुस्तके स्वतः मुलांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. हर्षदा खानविलकर आपला आनंद व्यक्त करत म्हणाल्या, "आयुष्यात कधी कधी अनपेक्षित गोष्टी घडतात आणि त्या आत्मिक आनंद देतात. कारण त्या अनपेक्षित असतात. हे वर्ष माझ्यासाठी अशाच आनंदाचे वर्ष आहे. याचा मी अनुभव 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर घेतला. पहिल्यांदा मला वाटलं की हा प्रॅन्क असेल, पण नाही... ते खरं होतं आणि माझी तुळा केली गेली".
हर्षदा पुढे म्हणाल्या की, "मला संधी दिल्याबद्दल झी मराठीचे खूप खूप आभार!! मुलांच्या डोळ्यातील आनंद आणि हसू पाहून मन भरून आलं. झी मराठीने यापूर्वीदेखील सामाजिक बदल घडवण्याचं नेतृत्व हातात घेतलं आहे आणि मला अशा चॅनेलसोबत काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे". यापूर्वी झी मराठीने 'कमळी' या मालिकेच्या निमित्ताने गरजू मुलींसाठी सायकल वाटप केले होते. झी मराठी आणि अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा हातभार लागला.